yuva MAharashtra अफगाणी शरणार्थींना भारत देणार आश्रय, विशेष व्हिसा

अफगाणी शरणार्थींना भारत देणार आश्रय, विशेष व्हिसा


अफगाणी शरणार्थींना भारत देणार आश्रय, विशेष व्हिसा

नवी दिल्‍ली/काबूल; वृत्तसंस्था : मवाळ चेहरा धारण करीत तालिबान्यांनी अफगाणिस्तानात शांततेची आणि स्त्रियांना इस्लामच्या चौकटीत मोकळीक देण्याची हमी दिली असली तरी तालिबानी राजवटीचा कहारी अनुभव असल्याने अफगाण सोडण्याकडे जनतेचा कल वाढला आहे. अफगाणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणतानाच आश्रयाला येऊ पाहणार्‍या अफगाणी नागरिकांनाही विशेष व्हिसा देऊन मदत करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, मदतीसाठी भारताकडे नजर लावून असलेल्या आपल्या अफगाणिस्तानातील बंधू-भगिनींना मदत करणे आवश्यक आहे. तेथील भारतीय नागरिकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही मोदी यांनी दिले. भारतीयांना परत आणण्याबरोबरच अफगाणी निर्वासितांनाही आश्रय देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला
.अफगाणिस्तानमध्ये राहणार्‍या सर्व भारतीय नागरिकांची अचूक माहिती मिळवण्याच्या कामाला आणि त्यांना तेथून मायदेशी आणण्याला सरकारचे प्राधान्य राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि अफगाणिस्तानमधील भारताचे राजदूत रुद्रेंद्र टंडन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे बाहेर असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

अफगाणमध्ये दहशत अन् सन्‍नाटा

देशात रस्तोरस्ती अराजकता दिसत आहे. तालिबान्यांशिवाय रस्त्यांवर कुणीही दिसत नाही. त्यांची वाहने आणि रणगाडे रस्तोरस्ती फिरत आहेत. दुकाने, बाजार आणि बँका बंद आहेत. तुरळक प्रमाणात मुले, तरुण आणि वृद्ध रस्त्यावर दिसत असले, तरी त्यांना तालिबान्यांकडून काही त्रास दिला गेल्याचे वृत्त नाही. तथापि, सर्वत्र दहशत आहे.

अफगाण सरकारच्या सैन्य आणि पोलिसांनी गाशा गुंडाळला आहे. सैन्याचे पोशाख उतरवले आहेत. सैन्यातील अनेकजण घर सोडून परागंदा झाले आहेत. या भीतीमुळेच महिला कर्मचार्‍यांनी सोमवारी ऑफिसला जाणे टाळले. हिजाब असलेल्या महिलांना कामावर जाण्यास तालिबानने हरकत घेतली नसली, तरी महिला भीतीपोटी बाहेर पडायला तयार नसल्याचे चित्र आहे.

काबूल विमानतळावर झुंबड

काबूल विमानतळावर अद्याप गर्दी असून, ज्यांच्याकडे व्हिसा आणि तिकीट आहे ते विमानतळाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. त्यातही विशेषत: अमेरिकी सेना किंवा इतर देशांसोबत काम केलेल्या नागरिकांचा समावेश आहे. भयभीत होऊन त्यांनी विमानतळाचा रस्ता धरला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांचे लोक या लोकांना आपल्यासोबत घेऊन जात असल्याचे चित्र आहे.

मीच काळजीवाहू राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सालेह यांची घोषणा

अफगाणिस्तानातील अनिश्‍चितता आणि अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी उपराष्ट्रपती अमीरुल्लाह सालेह यांनी स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले. रविवारी संपूर्ण तालिबानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह सालेह यांनी पलायन केले होते. त्यानंतर मंगळवारी ते अचानक प्रकटले. मी सध्या अफगाणिस्तानातच आहे. अफगाणिस्तानच्या घटनेनुसार, राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती काळजीवाहू राष्ट्रपती बनतात. त्यामुळे मीच कायदेशीर राष्ट्रपती ठरतो, असे सालेह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags