झरे (ता. आटपाडी) येथे आयोजित करण्यात आलेली बैलगाडी शर्यत आज (शुक्रवार) गनिमी काव्याने पार पडली. निश्चित स्थळा ऐवजी वाक्षेवाडी पठरावर बैलगाडी शर्यत घेण्यात आली. विशेष म्हणजे आमदार पडळकर यांनी पोलिसांना चकवा देत बैलगाडी शर्यत घेतली.
बैलगाडी शर्यत वाचली पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, परांपरा टिकली पाहिजे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे येथे या शर्यतीचे आयोजन केले होते. मात्र बैलगाडी शर्यतीला उच्च न्यायालयाची बंदी असल्याने जिल्हा प्रशासन आणी पोलिसांनी या शर्यतीवर बंदी घातली होती.
यासाठी जमावबंदी आदेश देखील लागू करण्यात आला होता. झरे गावाकडे जाणारे सर्व रस्ते प्रशासनाने बंद केले होते. शर्यंत होणारी जागा देखील प्रशासनाने काही कालावधीसाठी जप्त केली होती. असे असताना देखील आमदार पडळकर यांनी ही शर्यत होणार असे सांगितले होते.
झरे येथे पोलिस कडक बंदोबस्तात व्यस्त असताना आमदार पडळकर यांनी गनिमी काव्याने झरे गावाजवळ असलेल्या वाक्षेवाडी पठारावर ही शर्यत घेतली.३ हजार पोलिसांना चकवा…
झरे येथे बैलगाडी शर्यत होऊ नये यासाठी पोलिसांनी ३ हजार पोलिसांचा फौजफाटा झरे गावात तैनात केला होता. परंतु पोलिसांना चकवा देत ही शर्यत पार पडली.