खंडोबाचीवाडी येथे भर दिवसा घरफोडी.... पोलीस प्रशासन हादरले....
खंडोबाचीवाडी ता. पलूस येथे आज मंगळवार दि. 31 /8 / 2021 रोजी उदय रामचंद्र मोकाशी यांच्या घरामध्ये कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील बेडरूम मधील लोखंडी तिजोरीचा दरवाजा उचकटून तिजोरीतील रोख रक्कम व सोन्याची व चांदीचे मौल्यवान दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खंडोबाचीवाडी येथील उदय रामचंद्र मोकाशी हे आपल्या संपूर्ण परिवारा सहित किर्लोस्करवाडी येथे नातेवाईकांच्याकडे घरगुती कार्यक्रमानिमित्त आज सकाळी 9:00 वाजण्याच्या सुमारास गेले होते. तेथील कार्यक्रम उरकून ते दुपारी 2:00 वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता घराच्या दरवाजाचे कुलूप कोणीतरी अज्ञात इसमाने तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. व नंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांच्या घरातील बेडरूम मधील तिजोरीचा दरवाजा उचकटून त्यामध्ये असणारे सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.उदय मोकाशी यांनी सदर घटनेबाबत भिलवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कळविले असता. भिलवडी पोलिस ठाण्याच्या पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे.सदर घटने संदर्भात भिलवडी पोलीस ठाण्यात पुढील कारवाईचे कामकाज सुरू असल्याचे समजते...