गणेश भक्तांनी अगदी साध्या पद्धतीने केले गणेश विसर्जन
भिलवडी | दि.19/09/2021
भिलवडी व परिसरामध्ये लाडक्या बाप्पांना अगदी साध्या पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने, साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला.गणपती बाप्पा मोरया.., पुढच्या वर्षी लवकर या.. च्या गजरात लहान थोरांनी आपल्या घरी प्रतिष्ठापना केलेल्या घरगुती गणपती बाप्पांना निरोप दिला.
पलुस तालुक्यामध्ये कोरोनामुळे यावर्षी गणेश विसर्जन प्रक्रिया साध्या पद्धतीने करण्यात आली. दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज कोरोनाचे सर्व नियम पाळून, अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केले गेले, तेही कोणत्याही मिरवणूकी विना.. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत, कृष्णा नदी काठावरील भिलवडी येथील कृष्णा घाटावर,श्रीक्षेत्र औदुंबर येथील घाटावर तसेच नागठाणे बंधाऱ्याजवळ बाप्पाला आरती करून, घोषणा देत निरोप दिला गेला.
कोविडच्या नियमांमुळे यावर्षीही गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला गेला.विसर्जन ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती परंतू गणेश भक्तांनी कोरोना विषयी शासनाने केलेल्या नियमांचे पालन करून,गर्दी होवू नये याची खबरदारी घेतल्याने गणेश विसर्जनाच्या वेळी प्रशासनावर येणारा मोठा ताण कमी झाल्याचे दिसून आले.