भिलवडी येथील शासनाच्या धान्यापासून वंचित राहिलेल्या पूरग्रस्तांना काँग्रेसच्या वतीने धान्यवाटप सुरू.
भिलवडी | दि. 16 / 09 / 2021
जुलै २०२१ ला आलेल्या महापूरामध्ये पुरबाधित नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून शासनाच्या वतीने ज्यांच्या घरात पाणी गेले होते अशा पुरग्रस्त नागरिकांना शासनाच्या वतीने मोफत दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ तसेच पाच किलो डाळ देण्यात आली. भिलवडी येथील २१९० लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळाले परंतु घरामध्ये पाणी जावून देखील सुमारे दोनशे पुरग्रस्तांना शासनाच्या वतीने देण्यात आलेले मोफत धान्य मिळाले नाही.दिड महिना उलटून गेला तरी अद्याप भिलवडी येथील पुरग्रस्तांना सानुग्रह अनुदानासह शेती,व्यवसाय यासह इतर नुकसानी बाबत कोणतीही मदत मिळाली नाही. पुरामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालेल्या बहुतांश मजूर कुटूंबांच्या हाताला काम राहिले नाही.
त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.महापूर ओसरल्यानंतर या कुटुंबांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे होते.शासनाच्या वतीने पुरग्रस्तांना तातडीने प्राथमिक मदत म्हणून मोफत धान्य देण्यात आले परंतु या मदती पासून भिलवडी येथील घरामध्ये पाणी गेलेली सुमारे दोनशे पंचवीस पूरबाधित कुटुंबे वंचित राहिली होती.प्रशासनाकडून त्यांना मोफत धान्य मिळण्याची शक्यता धुसर बनू लागली होती.त्यामुळे हि कुटूंबे मदती पासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.या गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन,
माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम (दादा) पाटील व भिलवडी येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबांना मोफत धान्य देण्याचे ठरविले व त्यानुसार काँग्रेस पक्षाच्या वतीने धान्य खरेदी करून गुरूवार दि.१६ सप्टेंबर रोजी भिलवडी येथील उत्तर भाग सोसायटीच्या धान्य विभागातून लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यास सुरुवात केली आहे.
जे पूरग्रस्त मोफत मिळणाऱ्या धान्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत अशा वंचित लाभार्थ्यांची यादी उत्तर भाग सोसायटीच्या बाहेर लावण्यात आली आहे. तरी वंचित लाभार्थ्यांनी सदर यादीतील आपल्या नावांची पडताळणी करून सदरचे मोफत धान्य घेऊन जावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ.सविता महिंद पाटील यांनी केले आहे.
त्याच बरोबर सानुग्रह अनुदान तात्काळ मिळावे यासाठी भिलवडी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे यावेळी सरपंच सौ. सविता महिंद पाटील व उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.