महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत मनसेकडून देण्यात आले निवेदन...
भिलवडी परिसरातील विज ग्राहकांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास मनसे स्टाईलने आंदोलन..
भिलवडी | दि. 25/09/2021
भिलवडी व परिसरात महावितरणचा सुरू असलेला भोंगळ कारभार तात्काळ बंद करावा तसेच अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी उद्धटपणे न बोलताना, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढावा.येत्या दोन दिवसांमध्ये विज ग्राहकांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी भिलवडी येथे दिला आहे.
महापूर काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या. महावितरण भिलवडी शाखेमधील कर्मचारी व अधिकारी यांच्या कामामध्ये गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून हलगर्जीपणा दिसून येत असून, नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आवश्यक असणारा कर्मचारी स्टाफ लवकरात लवकर वाढवावा, कर्मचारी व अधिकारी यांनी ग्राहकांशी उद्धटपणे बोलू नये, अधिकाऱ्यांनी कार्यालयात वेळेमध्ये हजर असावे. ग्राहक तक्रार रजिस्टर मधील सर्व तक्रारी लवकरात लवकर मार्गी लावाव्यात.
त्याचबरोबर ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन करताना काही कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याचे दिसून येत आहे.असे प्रकार थांबविण्यासाठी योग्य ते आदेश देवून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशा विविध मागण्यांचे लेखी निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भिलवडी येथील महावितरण शाखेमध्ये उपस्थित असणारे महावितरणचे अधिकारी पाटील यांना देण्यात आले.
येत्या दोन दिवसांमध्ये सदरच्या मागण्या मान्य न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व यास पूर्णपणे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जबाबदार राहील.असा इशारा ही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देते वेळी विभाग अध्यक्ष रोहित भोकरे,दिलीप निकम, अमोल पाटील, जगदीश काटे,योगेश भागवत,राजू तेली,वैभव येसुगडे,सदिप येसुगडे व नागरिक उपस्थित होते.