कृष्णा नदी काठावरील लोकांनी घाबरून जाऊ नये..परंतु सतर्क राहावे...
लालासाहेब मोरे....
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग मंदावला...
भिलवडी | दि. 14/09/2021
कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कृष्णा नदी काठावरील नागरिकांना सध्या तरी थोडासा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, सध्या कोयना धरणाचा पाणीसाठा साठा १०४.७० टीएमसी तर वारणा धरणाचा पाणीसाठा ३४.४० टीएमसी आहे.सध्या कोयना धरणातून ५० हजार क्युसेस पाणी कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.त्यामुळे सोमवार पासून कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास पलूस तालुक्यातील नागठाणे येथील बंधारा पाण्याखाली गेला असून, नागठाणे व शिरगाव या गावांचा संपर्क तुटला आहे.कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ झाल्याने कृष्णामाई दुथडी भरून वाहत आहे. भिलवडी येथील कृष्णा घाटा समोरील दोन्ही मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
सध्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पाणीपातळीत वाढ होत असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग काहीसा मंदावला असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये परंतु सतर्क राहावे असे आवाहन इस्लामपूर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांनी केले आहे.