माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी तहसीलदार निवास ढाणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर...
भिलवडी | दि.11/09/2021
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ई पीक पाहणी ॲपवरुन शेतकऱ्यांना थेट आपल्या बांधावरून पीक नोंदणी करता येणार आहे.यानिमित्ताने शेतकऱ्यांनी स्वतःचे पिक पाणी स्वत: सातबारा सदरी ऑनलाइन नोंद करण्याबाबत पलूसचे तहसीलदार निवास ढाणे व भिलवडी गावचे तलाठी गौसमहंमद लांडगे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना ई पिक ॲप व त्यामध्ये भरावयाच्या माहिती बाबत मार्गदर्शन केले.
सन २०२१-२०२२ या महसुली वर्षांपासून ७/१२ वर पिकाची नोंदणी फक्त मोबाईल मध्ये ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातूनच होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी ॲप इन्स्टॉल करून प्रत्यक्ष आपल्या शेतात जाऊन,आपल्या शेतातील पिकाची माहिती या ॲपमध्ये योग्यरीत्या अचूकपणे भरून, पिकांचा फोटो काढून भरावयाची आहेत.
यानंतर तलाठी कार्यालयामार्फत आपल्या शेतातील पीक पेऱ्याची माहिती भरली जाणार नाहीत .
त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची माहिती स्वतः भरणे आवश्यक आहे. एका रजिस्टर मोबाईल मध्ये जास्तीत जास्त २० शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदविता येईल. मोबाईलवर आलेला ४ अंकी ओ.टी.पी हा कायमस्वरूपी पासवर्ड राहील, त्यामुळे परत तुम्हाला पीक नोंदणी करताना हा पासवर्ड आवश्यक राहील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन करून, पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी भिलवडी येथील भुवनेश्वरवाडी व भटकी परिसरातील तसेच माळवाडी,चोपडेवाडी व सुखवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांना ई पिक ॲप विषयी मार्गदर्शन केले.
ई पाहणी पीकॲपमध्ये पीक नोंदणी ही १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीतच करायची आहे. या कालावधी नंतर पीक पाहणी नोंद होणार नाही, कारण त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांची ई पीक पाहणी सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या कालावधीतच आपल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून करून घ्यावी. अशी माहितीही तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.यावेळी वसंतराव मोहिते, रविंद्र यादव,कृष्णात यादव,अनिकेत जगताप, रमेश यादव या शेतकरी बांधवांसह भिलवडी गावचे तलाठी गौसमहंमद लांडगे उपस्थित होते.