भिलवडी | दि. 21/09/2021
पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी धनगाव दरम्यान पडीक शेतातील काटेरी झाडांची लाकूडतोड करून, कोळसा बनविणाऱ्या आदिवासी कुटुंबातील महिलेचा पतीनेच खून करून फरार झाल्याची घटना दि.१८ सप्टेंबर २०२१ रोजी उघडकीस आली होती.पत्नीचा खून केल्यानंतर संशयित आरोपी गणपत दाजी पवार वय वर्षे ५० मुळगाव आंबेगाव (पवनानगर) ता.मावळ,जि.पुणे सध्या राहणार धनगाव हा फरार झाला होता.
धनगाव बुरूंगवाडी दरम्यान कॅनॉल जवळील धनगांव येथील शेतकऱ्याच्या पडीक शेतातील काटेरी झाडांची लाकूडतोड करून, कोळसा बनविण्याचे काम करीत असलेल्या कांताबाई गणपत पवार वय वर्षे ४५ व गणपत पवार या दोघा नवरा बायकोमध्ये दि. १७ सप्टेंबर रोजी रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला.या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले.यामध्ये गणपत पवार याने पत्नी कांताबाई हिला काठीने जबर मारहाण केली.त्यामध्ये कांताबाई हिच्या शरिरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व त्यातच तिचा मृत्यू झाला.
त्यानंतर संशयित आरोपी गणपत दाजी पवार यांने तेथून पलायन केले.पळून जात असताना तो सी.सी.टिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. सीसीटीव्ही फुटेज व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या साहाय्याने भिलवडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित, संशयित आरोपीचा शोध घेणे सुरू केले. विविध भागात पोलीस पथके पाठविण्यात आली.आज दि.२१ सप्टेंबर रोजी सी.सी.टीव्ही फुटेजमधील व्यक्ती समडोळी ता.मिरज येथे असल्याची माहिती पोलीस खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली.यानंतर सांगली ग्रामीण पोलीस व भिलवडी पोलीसांनी यांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवून व समडोळी गावात सापळा रचून खून प्रकरणातील संशयित आरोपी गणपत दाजी पवार यास ताब्यात घेतले.
यानंतर सदर खूनाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता, दारूच्या नशेत पत्नी कांताबाई हिचा खून केला असल्याची कबुली संशयित आरोपी गणपत दाजी पवार याने पोलीसांना दिली आहे.दरम्यान सदर संशयित आरोपीस पलूस न्यायालयामध्ये हजर केले असता, मा.न्यायालयाने गणपत पवार यास २४सप्टेंबर २०२१ पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे.