भिलवडी : पंचशिल नगर मधील स्वच्छता बाबतींत तात्काळ उपाययोजना न केल्यास अमरजीत कांबळे यांचा आंदोलनाचा इशारा...
ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांमधून नाराजी...
भिलवडी | दि. 13/10/2021
भिलवडी ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे भिलवडी येथील पंचशिल नगरमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, पंचशिल नगरला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून भिलवडी येथील पंचशिल नगरमधील स्वच्छतेबाबत ग्रामपंचायत प्रशासन कानाडोळा करीत असून, वॉर्ड क्रमांक १ मधील नागरिकांच्या समस्यांकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.पंचशिल नगर येथील गटारांमधील घाण काढून जवळपास पंधरा दिवस झाले तरी ती घाण उचलून नेली नाही.येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर ओल्या,सुक्या कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.महापूर येवून गेल्यानंतर कृष्णाकाठावरील गावांमध्ये डेंग्यू,चिकणगुणीयासह थंड-ताप यासारखे साथीचे आजार पसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच ग्रामपंचायती कडून स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता, तात्काळ सदर भागातील स्वच्छता करून घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आर पी आयचे पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजीत कांबळे यांच्यासह वाॅर्ड क्रमांक १ मधील नागरिकांनी दिला आहे.