"जीवन संघर्ष"
(पुस्तक परीक्षण लेखक चंद्रकांत मोतीराम जोगदंड ,पुणे)
मुंबई : ठाणे | दि.24/10/2021
समाज जीवनात जगत असताना परिस्थितीचे दाहक चटके सोसत वास्तविक जीवनातल्या संघर्षाला माणसाला तोंड द्यावे लागते . संघर्ष हा अटळ आहेच , यालाच तर जीवन म्हणतात! जीवन प्रवास करत असताना संघर्ष करत करत यशाची पायरी गाठणे, व आपले ध्येय साध्य करणे हे ज्या व्यक्तीला जमते; ती व्यक्ती कुठेच कमी पडत नाही . मग तो संघर्ष शिक्षणाचा असो किंवा जीवनातील अडीअडचणींचा असो, त्यावर मात करावीच लागेल , शिक्षणाचा गंधही नसलेल्या समाजात जेव्हा, एखाद्या प्रज्ञा सूर्याचा जन्म होतो. व संपूर्ण समाजच बदलत असतो. त्याने दिलेल्या शिक्षणाच्या व संस्काराच्या आधारित जीवनावर नवीन पिढी निर्माण होत असते. वास्तविकतेची चटके सोसलेल्या समाजात संघर्षाची तर दरी पाहायला मिळते, वास्तवतेच्या चटक्यात माणूस होरपळून निघतो व अन्यायाला वाचा फुटते. अंतर्मनाच्या पटलावर झालेले संस्कार त्याला गप्प बसू देत नाहीत , व अधोरेखित जीवनाचे सत्य मांडले जाते तेव्हा, सत्याचा शोध घेत असताना मनातील उन्मळून आलेल्या भावना शब्दरूपी, अलंकारांणी सजलेल्या मनावर तरंगू लागतात, भावनांचे तरंग वास्तवात उमटतात परिस्थितीची जाणीव करून देतात. व त्याच अधोरेखित भावनांना कुठेतरी वाट मोकळी करून देत असताना मनाच्या खोल गर्तेमध्ये दडलेल्या भावनांचे बांध वाहू लागतात .त्यातूनच तर कविता जन्म घेत असते !......हेच तर कवी मनाने जपलेल्या जीवनाचे अखिल मानव जातीला समृद्धपणे ऊद्धारण्याचे सुधारण्याचे सर्वात मोठ साधन आहे. असाच संघर्ष जगत असताना आमचे
" कवी नवनाथ रणखांबे" हे अनेक अडचणींना तोंड देत यशाची एक एक पायरी चढत आहेत , जीवनातील संघर्षाला त्यांनी निर्भयपणे तोंड देऊन, येणार्या संकटांना दूर लोटल आहे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगायचे झाले तर नम्रपणा बरोबर कणखरपणा हे त्यांच्या वास्तविक जीवनाचे दाहक उदाहरण आहे. समाज जीवनाचे अनेक चटके त्यांनी अनुभवलेले आहे. म्हणूनच त्यांच्या "जीवन संघर्ष " या काव्यसंग्रहा विषयी बोलायचे झाले तर अन्याय मूलक व्यवस्थेशी संघर्ष करत शोषणमुक्त व भयमुक्त जगण्याची प्रेरणा देणारा हा काव्यसंग्रह जाती व धर्माच्या ही पलीकडे जाऊन अहंकाराला मूठमाती देत माणूस पण जगायला शिकवतो . व स्वतंत्रपणे मुक्तपणे गगन भरारी घेण्याची प्रेरणा देतो . प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी दिलेली प्रस्तावना ही जीवनाचा वेध घेणारी कविता नवनाथ रणखांबे यांच्या जीवन संघर्षाचे पैलू पाडतात ,व त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची जाणीव करून देतात.ओबडधोबड भाषाशैली मधून रणखांबे यांनी खेड्यापाड्यातील समाजजीवनाचे वास्तव दर्शन, या काव्यसंग्रहातून घडवल आहे .सांगली जिल्ह्यातल्या गौरगाव या खेड्यामध्ये त्यांचं बालपण गेलं.सैन्य दलात सेवा केलेल्या वडिलांचा त्यांना वारसा लाभलेला आहे . तसेच शेती व शेतीसोबत पूरक व्यवसाय करून त्यांच्या वडिलांनी त्यांना घडवल आहे. अनेक थोर शिक्षकांचा त्यांना सहवास लाभला आहे. तसेच बाबासाहेबांची चळवळ ही त्यांच्या घरांमध्ये त्यांना पाहायला मिळाली आहे .त्यामुळे सहज त्यांनी कविता व चारोळ्या लिहून आपल्या कवी जीवनाला सुरुवात केली आहे . अनुभवलेल्या वास्तवातल्या अनेक कल्पना त्यांनी कागदावर उमटवून काव्य रुपाने "जीवन संघर्ष" या काव्यसंग्रहात मांडण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगा आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुरोगामी "शाहू फुले आंबेडकर ", चळवळ ही त्यांच्या कवितेची उगमस्थान आहे. त्याबरोबर घरातील थोरामोठ्यांचा सहवास त्यांना कायम लाभला असल्यामुळे , कवितेच्या जगतात ते उंच भरारी घेत आहेत , हाच तर खरा मोठा "जीवन संघर्ष "आहे ना !जीवनाची आभाळाची माया जन्म दिलेल्या व संस्कारांनी पेरलेल्या बुद्धांचे तत्त्वज्ञान व अष्टांग मार्ग पाळणाऱ्या समाजाचे ते पाईक आहेत .म्हणूनच जन्म दिलेल्या मातेविषयी त्यांचं मन गहिवरून जातं ते म्हणतात.....
" गरीबीलाच लाज वाटली गरीबीची
जीवनाला उपास मारी होती जगण्याची "......
पिलांच्या स्वप्नासाठी तीळ तीळ तुटणारी त्यांची माय कष्टातून फुलवलेल्या गरिबीचे श्रीमंत उदाहरण वाटते. तेव्हा म्हणतात ......
"माय तुझ्यात मी मलाच पाहिलय, मलाच पाहिलय "...
बळीराजाच्या जगण्याला निसर्गाचा कोप हा तर नेहमीच असतो परंतु बोगस बियाणे माथी मारून धनदांडग्यांनी बांधलेल्या इमल्यावर रणखांबे यांची तोफ भडकते व ते म्हणतात......
" उधळं जगणं कर्ज खोट्या जगण्याला
बोगस उधळण्यांनी, पिके कर्जे घेऊन
बांधली माडी, घेतली गाडी "
कोरडा दुष्काळ ने पिचलेल्या मनावर झालेल्या वेदना यावर भाष्य करताना कवी पावसाला म्हणतो.........
" वेड्यासारखा नको तिथे
धो धो पडू नकोस "
जगण्याची शोकांतिका दुष्काळाने मांडताना होणारी जिवाची तगमग कवीला स्वस्थ बसू देत नाही. हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या हाती काहीच उरत नाही. उपाशी जनावरांकडे बघत असताना त्याचा जीव भरून येतो व या काव्य पंक्तीत सहज मनाला वाट मोकळी करून देतात.........
" चारा छावणीने जनावरे नेली
वरूणा विना पीकं रुसून गेली "
गावात आता जगायचं कसं ? या अर्त ओळी जीवनात जगण्याचा प्रश्न उभा करतात. निसर्गाचे चक्र हे अव्याहतपणे चालूच आहे .निसर्ग का कोणासाठी थोडा थांबला आहे ? याच निसर्गाचे संगोपन करण्यासाठी कवी ला झाडाचे महत्व खूप आहे. झाडांविषयी आदर व्यक्त करताना कवी म्हणतो ...
"झाडे म्हणजे श्वास
श्वास म्हणजे जगणे
पाऊस म्हणजे पाणी
पाणी म्हणजे जीवन"
या बहुमूल्य आणि साध्या ओळी निसर्गाचे जतन करायला शिकवतात. कारण पृथ्वीवरील ओझोनचा थर हळूहळू कमी होत चालला आहे. याची कवीला चिंता वाटते आहे म्हणून पुढील आयुष्यासाठी झाडे लावणे खूप महत्त्वाचे आहे . व निसर्गाचा समतोल साधणे याची कवीला जाण आहे. कारण आसमानी संकटाला तोंड देत असताना झालेली तारांबळ ही जीवनाचा आकांत सांगून जाते . व अडचणी वाढवत असते म्हणून समृद्ध जीवनासाठी पर्यावरण रक्षण हे गरजेचे आहे. असे कवीला वाटते. यशाची शिखरे चढत असताना शिस्तीने जगलेल्या जीवनाचे फलित झाल्यासारख नक्कीच वाटणार कवी म्हणतात .........
"नियोजन मेहनत शिस्तपालनाने
मनोगत पूर्ण यशस्वी मुकाबल्याने "
हे "बा" नी शिकवलेल्या यशाचे गमक आहे. बापाच्या कष्टाची व संस्काराची कवीला जाण आहे.
कमी शब्दात अनेक विषय हाताळत असताना अनेक विषय त्यांनी पेलून धरले आहेत . जुन्या चालीरीती रितीरिवाज हे कवीला आकर्षून घेतात तेव्हा ते म्हणतात....
" गावोगावी फिरताना
वासुदेवाची फेरी .....
कथांची स्टोरी
डोंबाऱ्याचा खेळ
कसरतिचा मेळ "......
पोटासाठी भटकंती करत असताना केलेला संघर्ष हा या काव्यपंक्तीतून नक्कीच सांगता येईल. दाहक विषमतेविरुद्ध बोलताना कवी दिवसाढवळ्या दुर्बल असंहाय्यतेचा फायदा घेणाऱ्या समाजावर कवी आसूड ओढत असताना;
" दिवसाढवळ्या मानवतेची नग्न धिंड
हसतायत बलात्कारी हैवांनी षंढ "........
हे फटकारे कवी मारतो तेव्हा शोषणाच्या दुष्टचक्रात मानवतेला डाग लागलेला डाग पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असताना एखाद्या शब्दाची मनात टोचत असलेली सल ही माणसाच्या जीवनाचे उद्ध्वस्त मनाचे भांडार असते . " शब्दाला जाळा " या कवितेतून कवी म्हणतात ....
"काळा इतिहास पुन्हा होऊ द्यायचा नाही
एकतेची जूट आपली तूट होऊ द्यायची नाही".......
हे खरे जीवन संघर्षाचे आयुष्याचे सोनेरी पान आहे . जीवन संघर्षाची यात्राही कवीला शोषित, पीडित, बहिष्कृत, वंचितांच्या , " अठराविश्वे दारिद्र्या " ची सलत असलेली जखम " जातीच्या ग्रहणाने " अधिकच धुसर केलेली दिसते . ही सल मनात ठेवून कवी म्हणतो.....
" मळभ होती प्रेमालाही जातीची
उतरंड होती प्रेमातही जातीची "....
बुरसटलेल्या जुनाट विचारांमध्ये प्रेमाच वादळ मात्र जातीच्या वादळात अडकून पडलेले दिसते . माणूस पण विसरलेल्या समाजामध्ये स्वतःचा शोध घेत असताना ,. कवी म्हणतात ........
" खुजांच्या दुनियेत हरवला विचार
श्रेष्ठ-कनिष्ठ ई भेद भावांनी "
प्रेमाच्या रंगाने भरलेले जीवन हे कवीला साद घालते तेव्हा .............
म्हणतो,माझी जीवनसाथी होशील का ?
माझ्या जीवनात तूच येशील का ? ...
ही ललकारी नक्कीच कवीला कुठेतरी अस्वस्थ करत असेल . इतिहास पुरुष हा वेगवेगळ्या इतिहासाच्या खुणांचा साक्षीदार असतो .म्हणून तर त्याच्यामुळे इतिहास घडत असतो . असाच ग्रेट मॅन कवीला बोधिसत्व परमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने भेटलेला आहे. आयुष्याचं सोनं झालेल्या या महापुरुषाच्या विचाराने कवी समाजजीवनात वागत आहे. बाबासाहेबांविषयी लिहिताना ते म्हणतात..
" बाबा या दुनियेचा स्वाभिमान
जागृत केलात .......
पिढ्यानपिढ्याचं शापित जिणं
लाथाडलत........... "
प्रगतीचे विश्व उभी करून समाजामध्ये नवीन क्रांती घडवली. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याच्या साठी नवी उभारी जीवनाला दिली . म्हणूनच " मोडेल कणा " पण वाकणार नाही ही शिकवण तर दिलीच , परंतु धम्माने फुललेले जीवन हे बोधिसत्वाच्या त्रिशरण पंचशील तत्वाने आचरणात आणल्या वर जीवन सार्थकी होते.आयुष्यातील चढ-उतार उंच भरारी मारण्यास शिकवतात. हल्ली सत्तेच्या खुर्ची साठी माणूस रसातळाला गेला आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये अनेक वीरांनी बलिदान देऊन हा महाराष्ट्र घडवला आहे .परंतु आताची सत्तेची समीकरणे पाहता कवी अस्वस्थ होतो तो या वाक्यातून......
"काळ बदलला वेळ बदलली
राजवट बदलली माणसे बदलली "
याचं श्रेय मात्र राजकारणी लोकांना देतो. कागदी कागदी घोडे नाचवून आलेल्या सवलती कागदावरच रेखाटून त्याची विल्हेवाट लावण्यात आताचे राजकारणी मागेपुढे पाहत नाही. म्हणूनच
शेवट अजून बाकी
"भेदभाव अजून
संपला नाही
भेदभाव वाढत
आहे पसरत....."
" तडा गेलेल्या विश्वासाला अविश्वासाचे ग्रहण लागते "
प्रेयसीने दिलेली वचने जेव्हा आठवू लागतात तेव्हा मन सुखाच्या झोपाळ्यावर आनंदाने डोलू लागते , तेव्हा अखेरच्या श्वासापर्यंत तिच्या आठवणींची " काहिली " मनाला सतावत असते . तेव्हा या ओळी नक्कीच अंतरगामध्ये नवी साद निर्माण करतात त्या अशा........
" वचनाने दिली तुझ्या वचने
स्वप्नाने दाखवली तुझ्या स्वप्ने "
या मनातील स्पंदना" च्या ओळी "अखेरच्या श्वासापर्यंत "कायम जपाव्यात अशाच आहेत. "प्रीत फुलाच्या" आठवणींचा क्षण कायमस्वरूपी जपण्यासारखा आहे. आयुष्याच्या पहिल्या प्रेमात मन डोलू लागतं..तेव्हा कवी म्हणतो..
" तूच मनाच्या गाभार्यात आयुष्याच्या पहिल्या प्रेमात"
अशा हळव्या प्रियतमेची साथ कवी कधीच सोडणार नाही.........
"अहंकाराने भरलेल्या मनात शब्दांनी दुखावलेल्या हृदयात "
जीवनाच्या लढ्यात काळोखाला पेटवण्याची ताकत कवी मध्ये आहे.
त्याच्या "पाझर फुटलेल्या मनात "कुठे तरी "मोकळा श्वास" घेऊन पहाटेच्या किलबिलनाऱ्या पक्षांकडे नजर जाते . व नवी पहाट होते. या कुशीवरून त्या कुशीवर रात्री जागत आलेल्या स्वप्नांची वास्तवाची दुनिया नवी उभारी देते. व येणाऱ्या संकटावर मात करायला शिकवते . हा तर संघर्ष उद्याच्या जीवनाचा व जगण्याचा महत्त्वाचा आयुष्याचा साक्षीदार आहे . संघर्ष तर करावाच लागणार आहे म्हणून कवी म्हणतो.......
" संघर्षाने शिकवलं माझ्या,
जीवनाला जगायला
हिमतीने माझ्या कष्ट करायला "
स्वप्नाने माझ्या पूर्ण करून घ्यायला
व दुःखाने माझ्या पचवून संकटावर मात करायला" ।....
दिवस येतील , आणि जातील सुखही येईल, आणि जाईल आयुष्य असेच चालत राहणार आहे . जुन्या स्मृती नवीन आठवांचे विचारांची व समाज जीवनातील संघर्षाची गाथा कायमच गावी लागणार आहे. "जगाच्या विद्यापिठात" अनुभवांच्या खजिन्यात बघाच आप्तस्वकीयांच्या खजिनाही सुख समृद्धीने भरायचा आहे. विषमतेच्या अंधारात बुडालेल्या माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवायच आहे . आजचा समाज हा कुशल व सद्विवेक बुद्धी बनवायचा आहे. म्हणूनच "जीवन संघर्षाच्या "या काव्य प्रांतांमध्ये डोकावून पहात असताना येणाऱ्या अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून ,सुखकर जीवनासाठी संघर्ष करायचा आहे . हाच तर खरा "जीवन संघर्ष " आहे...........
पुस्तक -: जीवन संघर्ष
कवी -: नवनाथ रणखांबे
पाने -: ८०
स्वागतमुल्य -: ८०₹
पुस्तक परीक्षण लेखक :- चंद्रकांत मोतीराम जोगदंड,
हडपसर पुणे, 28 दिनांक 17 ऑक्टोंबर 2021