माळवाडी येथील पूरग्रस्तांच्या उपोषणाचा दुसरा दिवस...
कडाक्याच्या थंडीत सुद्धा उपोषण कर्त्यांचे उपोषण पुढे सुरूच..
भिलवडी | दि.२८/१०/२०२१
पलूस तालुक्यातील माळवाडी येथे दिनांक २७ ऑक्टोबर पासून, सन २०१९ व २०२१ च्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या व अनुदानापासून वंचित राहिलेल्या पूरग्रस्तांचे उपोषण माळवाडी ग्रामपंचायतीच्या समोर सुरू असून आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
दि.२७ ऑक्टोबर रोजी दिवसभरामध्ये तालुका प्रशासनामधील अधिकारी व पदवीधर आमदार अरुण (आण्णा) लाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या परंतु आंदोलनकर्त्यांच्या समस्येवरती कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्यामुळे सदरचे उपोषण पुढे सुरूच राहिले आहे.
उपोषणकर्त्यांनी काल रात्री कडाक्याच्या थंडीत सुद्धा आपले उपोषण पुढे सुरूच ठेवले आहे. सदरच्या उपोषणाला डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस तालुका , भिमशक्ती संघटना पश्चिम महाराष्ट्र , महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलूस तालुका व तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे. आज दिवसभरामध्ये या उपोषणाची व आंदोलनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन योग्य तोडगा काढावा व अनुदानापासून वंचित असलेल्या पूरग्रस्तांना न्याय द्यावा..त्याचबरोबर आज दिवसभरात या आंदोलना बाबत प्रशासनाने योग्य तोडगा नाही काढल्यास हे आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चर्चा भिलवडी व माळवाडी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.