माळवाडी ता.पलूस येथे दुकान गाळ्यांना भिषण आग...
आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान...
भिलवडी | दि.13/10/2021
पलूस तालुक्यातील माळवाडी येथे निशीदी कॉर्नर जवळ आनंदा माळी यांनी आपल्या मालकीच्या भाडेतत्वावर दिलेल्या दुकान गाळ्यांना अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार भिलवडी माळवाडी रस्त्यावर निशीदी कॉर्नर जवळ असलेल्या दुकान गाळ्यांना दि.१३ ऑक्टोबर रोजी दुपारी साधारणता
१२:३० ते १ वाजण्याच्या सुमारास सर्व दुकानदार आपआपली दुकाने बंद करून जेवण करण्यासाठी आपापल्या घरी गेले असता,अचानक सदर दुकानातून धुराचे लोट निघत असल्याचे आनंदा माळी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता दुकानाला आग लागली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सर्व गाळा मालकांना फोन केले व बोलावून घेतले.त्याचबरोबर त्यांनी भिलवडी पोलीस ठाण्यासही फोन करून कळविले.
यावेळी जमा झालेल्या लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु दुकानाचे शटर बंद असल्याने आग विझविणे शक्य झाले नाही. त्यामुळे
गैबीसाहब शेख मेजर यांनी अग्निशामक दलाला तातडीने फोन केला. यानंतर काही वेळातच चितळे डेअरी,एच.पी.गॅस प्लॅन्ट हजारवाडी व तासगाव नगरपरिषदेचे अग्निशामक दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी आल्याने आग आटोक्यात आली व पुढील मोठा अनर्थ टळला.
या आगीमध्ये अभिजीत खामकर रा.खंडोबाचीवाडी यांचे ठिबक व शेती साहित्याचे दुकान , पोपट बापू चेंडगे रा. खंडोबाचीवाडी यांचे जनरल स्टोअर्स व बेकरीचे दुकान ,
जोशी यांचे हॉटेल , अशोक चौगुले यांचे इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान , राजू चौधरी यांचे इलेक्ट्रिक व प्लंबिंग साहित्याचे दुकान तर अमोल पाटील यांचे ऑनलाइन लॉटरी सेंटर होते. अचानक लागलेल्या आगीमध्ये सदर दुकानातील सर्व माल, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाल्याने सदर गाळा धारक दुकानदारांचे व गाळा मालकाचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करुन पंचनामा केला असता , शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थित लोकांमधून व पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.आगीची भीषणता इतकी होती की, धुराचे लोटच्या लोट सर्वदुर पसरल्याचे दिसून येत होते.सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.