माळवाडी ता.पलूस येथील पूरग्रस्तांचे बेमुदत आमरण उपोषण पुढे सुरूच....
पदवीधर आमदार अरुण आण्णा लाड , नायब तहसिलदार पलूस , गटविकास अधिकारी पलूस यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सुद्धा कोणताही तोडगा निघाला नाही...
भिलवडी | दि. २७/१०/२०२१
माळवाडी ता.पलूस :
महापूरामध्ये नुकसान झालेल्या व अनुदानापासून वंचित असलेल्या माळवाडी येथील मातंग समाजातील पूरग्रस्त नागरिकांनी आज दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाजले पासून माळवाडी ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
२०१९ च्या महापूरातील घरपडझडीच्या अनुदानापासून अनेक पूरग्रस्त अद्यापही वंचित आहेत. त्यांना तात्काळ अनुदान मिळावे...
२०२१ च्या महापूरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांचे घर पडझडीचे पंचनामे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी करून देखील ४० ते ४५ पूरग्रस्तांची नावे यादी मधुन वगळण्यात आलेले आहेत याची चौकशी व्हावी...
चुकीचे पंचनामे करणाऱ्या व यादीमधून नांवे वगळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी...
सदरच्या या प्रमुख मागण्यां घेऊन हे वंचित पूरग्रस्त नागरिक आज सकाळ पासून माळवाडी ग्रामपंचायतीच्या समोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषण करणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांच्या सोबत माळवाडी येथील मातंग समाजातील वंचित पूरग्रस्त महिला पुरुष देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारच्या सत्रामध्ये आमदार अरुण (आण्णा) लाड,नायब तहसीलदार पी.जी.उरकुडे,गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पंचायत समिती विस्तार अधिकारी मुल्ला मॅडम यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आंदोलन करते यांच्या समस्या जाणून घेतल्या व आंदोलन करणाऱ्या पूरग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांचे निरसन केले.
जिल्हा प्रशासनाकडून लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही कसल्याही परस्थितीत उपोषण मागे घेणार नाही अशी ठोस भुमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
त्यामुळे आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू न शकल्याने आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन असेच पुढे सुरू ठेवले आहे.
यावेळी पंचायत समिती उपसभापती अरुण पवार , सुभाष बाबर , मोहन पाटील सर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सागर सुतार, कुंडल चे सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.