कृष्णा काठच्या शेतकऱ्यांना दिलासा... दोन ते तीन दिवसांत नदीला येणार पाणी...
कोयना धरणातून १०५० क्यूसेक्स पाणी विसर्ग नदीपात्रात सोडला असून, दोन ते तीन दिवसांत पाणी सांगलीला पोहोचणार...
. लालासाहेब मोरे...
भिलवडी | दि.24/10/2021
पावसाळा व अवकाळी पावसामुळे कोयना धरण पुर्ण क्षमतेने भरले असताना देखील, कृष्णा नदी पात्रात पाणी नाही. त्यामुळे नेहमी सधन असलेल्या कृष्णा काठावरील शेती धोक्यात आली आहे. तसेच नदीच्या पात्रात पाणी कमी असल्यामुळे साठलेले पाण्यामुळे लोकांचे आरोग्य धाेक्यात आले आहे.
जुलै महिन्यात कृष्णा नदीला आलेल्या महापूरामुळे कृष्णाकाठची शेती जवळपास उध्वस्त झाली आहे.महिनाभरापूर्वी दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णानदीला आज डबक्याचे स्वरूप आले आहे. पलुस तालुक्याच्या परिसरात तर नदीच्या पात्रात पाणीच नाही. त्यामुळे गावाना पाणी पुरवठा करणाऱ्या इंटकवेलला पाणी नसल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनासमोर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
नदी पात्रात पाणी नसल्यामुळे जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे.सध्या शेतीला पाण्याची आवश्यकता आहे. मात्र नदी पात्रात पाणी नाही. त्यामुळे शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारीचे फुटव्हॉल उघडे पडले आहेत. एकंदरीत आधी पुराच्या पाण्याने तर आता पाण्याअभावी कृष्णा काठावरील शेतकरी उध्वस्त होणार कि काय अशी चिंता लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. सध्या महापूरानंतर पाऊस लांबल्यानमुळे कृष्णा नदी पहिल्यांदा कोरडी पडली असून, नदीकाठच्या शेतकऱ्यांना भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
पाटबंधारे विभागाने यादृष्टीने तातडीने दखल घेऊन कृष्णा नदीवरील सर्व बंधाऱ्यातील पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रत्येक बंधाऱ्यात पुरेसे लोखंडी बर्गे घालून पाणी अडविण्यासाठी योग्य नियोजन केले असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर व उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांनी दिली.सद्या कोयना धरणातून १०५० क्यूसेक्स पाणी विसर्ग नदीपात्रात सोडला असून, दोन ते तीन दिवसांत पाणी सांगलीला पोहोचणार आहे.तरी शेतकरी बांधवांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन इस्लामपूर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांनी केले आहे.