yuva MAharashtra धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेठरे धरण येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना....

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेठरे धरण येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना....



धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेठरे धरण येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना....

सिद्धार्थनगर येथील धम्म बांधवानी लोकवर्गणीतून साकारला नेत्रदिपक सोहळा....  

वाळवा : रेठरे धरण | दि. 15/10/2021

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अशोका विजयादशमी दिनी रेठरे धरण येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना लोकवर्गणीतून मोठ्या दिमाखदार सोहळ्याने करण्यात आली.



रेठरे धरण तालुका वाळवा येथील सिद्धार्थ नगर मधील सध्या मुंबई येथे नोकरी निमित्त असलेल्या तसेच स्थानिक  धम्म बांधवांनी शासकीय अनुदानाशिवाय स्वखर्चाने, लोकवर्गणी गोळा करून रेठरे धरण येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण केले. त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्ध यांची चार फुटांची तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अडीच फुटांची आकर्षक अशी मूर्ती यवतमाळहून आणली. शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी अशोका विजयादशमी दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुज्य भदन्त करूणा ज्योती महाथेरो,भदन्त धम्म ज्योती यांच्या हस्ते बोधीवृक्षाची पूजा करण्यात आली. 


त्यानंतर धम्म ध्वजारोहण करण्यात आले.त्रिसरण पंचशील ग्रहण करून दोन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी पुज्य भदन्त करूणा ज्योती महाथेरू यांनी शुभ्र वस्त्रे परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या उपासक,उपासिका यांना धम्म देसना दिली.तत्पुर्वी सिद्धार्थनगर येथील तरुणांनी बौद्ध विहारापासून दूर पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून, बौद्ध धम्माचे प्रतिक असलेले पंचशीला व निळे झेंडे लावले होते.



त्यातच या कार्यक्रमात सहभागी झालेले समता सैनिक दलाचे सैनिक व बौद्ध बांधवांकडून देण्यात येणाऱ्या घोषणांमुळे सारा परिसर बौध्दमय झाला होता. स्वागत कमानी पासून बौद्ध विहार पर्यंत पुष्पवृष्टी करून पुज्य भदन्त करूणा ज्योती महाथेरो, भदन्त धम्म ज्योती यांचे स्वागत करण्यात आले.


 या अनोख्या व नेत्रदिपक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने हातामध्ये निळे झेंडे घेऊन आलेल्या परिसरातील बौद्ध बांधवांमुळे रेठरे धरणमध्ये जणू काही निळे वादळच घोंगावत असल्याचे दिसून येत होते. उपस्थितांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.



कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सिद्धार्थ तरुण मंडळाने चोख नियोजन केले होते.

दरम्यान शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, सम्राट महाडिक, सत्यजित देशमुख, मानसिंगराव नाईक यांच्यासह मान्यवरांनी बौद्ध विहारास भेट देऊन तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.







Tags