संविधान प्रतिमेचा अवमान करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याची अमरजित कांबळे यांची मागणी...
तहसीलदार निवास ढाणे यांना सदर मागणीचे दिले लेखी निवेदन...
भिलवडी | दि. 28/11/2021
संविधान दिनाचा अनादर करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पलूस तालुकाध्यक्ष बोधिसत्व माने, कार्याध्यक्ष अमरजीत कांबळे व भिलवडी जि.प.गट अध्यक्ष राहूल कुंदे यांनी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार निवास ढाणे यांच्याकडे केली आहे.
दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिन साजरा केला जातो. या संविधान दिनादिवशी भिलवडी ग्रामपंचायतीमध्ये संविधान दिन साजरा केला परंतु संविधान दिन साजरा करीत असताना, एकही प्रशासकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य हजर नव्हते तसेच प्रतिमेच्या समोरच चपलांचे ढीग होते.
आपला भारत देश संविधानावरती चालत आहे, संविधान भारत देशाची शान आहे. मोठ्या उत्साहात भारत देशामध्ये संविधान दिन साजरा केला जातो परंतु भिलवडी ग्रामपंचायतीला या गोष्टीशी काहीही देणेघेणे नाही.
सरपंचाना फोनवरून विचारणा केली असता सरपंच सांगतात कि,आम्हाला संविधान दिन आहे याची कल्पना दिली नसल्याने आम्ही हजर नव्हतो तसेच ग्राम सेवकांना विचारणा केली असता ग्राम सेवक मला मिटिंग आहे अशी उत्तरे देत आहेत. तरी सदर घटनेचे कोणालाही गांभीर्य नाही. संविधान प्रतिमेचा अवमान करणाऱ्या व संविधान दिन साजरा करीत असताना अनुपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचेवरती योग्य ती कारवाई करावी व यांना त्यांच्या कामातून कार्यमुक्त करावे, अशी आम्ही विनंती करीत आहे.
सदर घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा पुढील कारवाईसाठी मा. जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडे निवेदन देण्यात येईल.
अशा आशयाचे लेखी निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका कार्याध्यक्ष अमरजीत कांबळे यांनी तहसीलदार निवास ढाणे यांना दिले आहे. निवेदन देतेवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पलूस तालुकाध्यक्ष बोधिसत्व माने, कार्याध्यक्ष अमरजित कांबळे, भिलवडी जि.प.गट अध्यक्ष राहुल कुंदे उपस्थित होते.