माळवाडी मुख्य चौक मटका व्यवसायाच्या विळख्यात...
खुलेआम मटका व्यवसाय सुरू...अनेकांचे प्रपंच देशोधडीला..
भिलवडी | दि. 12/11/2021
माळवाडी तालुका पलूस येथे मुख्य चौकामध्ये अनेक ठिकाणी मटका हा अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असून,मटक्यासारख्या अवैध व्यवसायांना वेळीच आळा न घातल्यास अनेक तरूणांचे प्रपंच देशोधडीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा पोलीस प्रमुखांनी तात्काळ याची गांभीर्याने दखल घेऊन, माळवाडी येथील अवैध व्यवसायांना पायबंद घालून सर्वसामान्य नागरिकांचे प्रपंच उध्वस्त होण्यापासून वाचवावेत अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात येत आहे.
पलूस तालुक्यातील माळवाडी गावात अवैध धंद्याचा दिवसेंदिवस वाढत असलेला कल पाहता, माळवाडी गावाला अवैध धंद्याच्या बाबतीत एक वेगळीच प्रसिद्धी मिळत असल्याचे दिसून येत आहे. माळवाडी गावात सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे शेतमजूर व इतर कामधंदा करुन आपला उदरनिर्वाह करतात.माळवाडी हे गाव अनेक वाड्या वस्त्यांना व गावांना जोडले असल्यामुळे अनेक गावातून लोक अवैध धंदे करण्यासाठी एकमेव माळवाडीलाच पसंती देत आहेत.
माळवाडी गावात अवैध धंदे करणारे बरेच लोक बाहेरच्या गावातील आहेत. बस स्थानक चौकात असणारे दुकान गाळे , पानटपऱ्या अवैध धंदे करणाऱ्या लोकांना भाडेतत्त्वावर देऊन गावातीलच काही लोक अवैध धंदे करणाऱ्यांना मदत करीत असल्याची चर्चा महिला वर्गासह गावातील लोक करीत आहेत. माळवाडी गावातील बस स्थानक चौकाला छत्रपती संभाजी राजांचे नाव देण्यात आले आहे. या चौकाला लागूनच तीन गावांची जीवनदायिनी असणारी पिण्याच्या पाण्याची टाकी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. याच चौकात काही दवाखाने व मेडिकल आहेत. संपूर्ण गावातील व परिसरातील लोक दवाखान्यासाठी व मेडिकलसाठी याच ठिकाणी येत असतात. प्रवासाला व बाजारहाट करण्यासाठी जाणारा
महिलावर्ग , शाळा,कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या परिसरातून जाताना मटका खेळण्यासाठी आलेल्या लोकांच्या घोळक्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.अनेक तरूणांनी मेहनत न करता केवळ मटका खेळून कमी वेळेत जास्त पैसे कमविण्याच्या नादात आपले प्रपंच देशोधडीला लावले आहेत.
माळवाडी मुख्य चौकात जसजसे धंदे वाढतील तसतसे अनेक तरूण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत.यामुळे अनेक जण कंगाल तर काही जण कर्जबाजारी झाले आहेत.या तरूणांचे प्रपंच व आयुष्य सुरळीत करण्यासाठी , अवैध धंद्यामुळे गावाची होत असलेली बदनामी थांबविण्यासाठी व तरुण पिढीचा भविष्याचा गांभीर्याने विचार करून जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी माळवाडी येथे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांना आळा घालावा व माळवाडी येथील मुख्य चौकात (बस स्टँड) अवैध धंदे प्रतिबंध क्षेत्र असा फलक लावण्यात यावा अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
तसेच सदरचे अवैध व्यवसाय तातडीने बंद न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे रोहित भोकरे यांनी दिला आहे.