भिलवडी : ऊसाच्या फडाला आग...
चार एकर ऊस व टिबक संच आगीत जळून खाक....
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान....
--------------------------------------------------------------------
भिलवडी | दि. ३० डिसेंबर २०२१
पलूस तालुक्यातील माळवाडी हद्दीमध्ये आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या फडाला अचानक लागलेल्या आगीत अंदाजे चार एकर ऊस जळून खाक झाला आहे.
प्रत्यक्ष घटना स्थळावरुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार आज भरदुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेजारच्या एका शेतकर्याने आपल्या शेतातील गाळपास गेलेला ऊसाचा फड दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पेटवल्यामुळे शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसाच्या फडाला आगीची झळ लागली व या आगीत माळवाडी येथील शेतकरी जनार्दन यशवंत साळुंखे यांचा अंदाजे दोन एकर , आण्णासो मुरग्याप्पा माळी यांचा अंदाजे एक एकर व विकास वावरे यांचा अंदाजे एक एकर अशे अंदाजे चार एकर ऊसाच्या फडाला आग लागून सदर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असणारे ठिबक संच देखील पूर्णपणे जळून खाक झाले आहेत.
त्याच बरोबर वसंत मोटकट्टे यांच्या शेतातील टिबक संच व निखिल राजेंद्र सावंत यांच्या शेतातील ठिबक संच व पी व्हि सी सब पाईप लाईन जळून खाक झाल्यामुळे या शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
या सर्व शेतकऱ्यांचा आगीत जळालेल्या उसाचा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करावा , कारखानदारानी हा उरलासुरला ऊस तात्काळ तोडून कारखान्यास नेण्यात यावा व शासना कडून मदत मिळावी अशी विनंती शेतकऱ्यांकडून केली जात आहे.