भिलवडी येथील शिक्षक शरद जाधव सर यांचा वाचन चळवळ रुजविण्यासाठी अभिनव उपक्रम....
--------------------------------------------------------------------
सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
---------------------------------------------------------------------
भिलवडी | २०/०१/२०२२
डिजीटल युगामध्ये ई-उपकरणांचा वाढता वापर वाचन संस्कृतीस मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे.समाजातील सर्वच स्तरातील वाचक वर्ग कमी झाल्याची खंत नेहमीच ऐकावयास मिळते. परंतु या परिस्थितीतही वाचन संस्कृती
रुजविण्याचे व वाढविण्याचे कार्य भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक शरद जाधव करीत आहेत.पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिलवडी सार्वजनिक वाचनालय आयोजित पत्रकार सत्कार व चर्चासत्र दरम्यान सर्वांनी पत्रकारांनीही अधिकाधिक वाचन केले पाहिजे अस मत व्यक्त केले.त्याचवेळी भिलवडी व परिसरातील सर्व पत्रकारांची वाचनालयाची वार्षिक वर्गणी त्यांनी स्वखर्चाने भरून सभासद करत अनोख्या पद्धतीने पत्रकार दिन साजरा केला.
भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी सार्वजनिक वाचनालय वाचन कट्टा हा उपक्रम राबवित आहे.त्यास ग्रामीण भागातील वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून आता भिलवडी व परिसरातील पत्रकार मंडळीही या वाचन चळवळीत सहभागी होणार आहेत.
ई-स्कूल टाईम्स, दि शरद शो या यु - टयुब चॅनलच्या माध्यमातून मुलांसाठी शाळा बंद ऑनलाईन शिक्षण सुरू असताना गोष्टींची शाळा,श्यामची आई पुस्तकातील संस्कारधन ही सुविचार मालिका,आनंददायी शिक्षण या विषयावरील शिक्षकांसाठी व्याख्याने आदी सह विविध शैक्षणिक पूरक उपक्रम ते विद्यार्थी व समाजाकरिता सातत्याने राबवीत आहेत. भिलवडी सार्वजनिक वाचनालयाने त्यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका पार पाडल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
या प्रवासात त्यांना जेष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून भावी काळात वाचनाचे बदललेले स्वरूप लक्षात घेत सर्वच प्रकारात वाचन संस्कृती अधिकाधिक ताकदीने जोपासण्याचा संकल्प त्यांनी जोपासला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
भिलवडी सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्रमात वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे,भू.ना.मगदूम,जी.जी.पाटील,
जयंत केळकर,डी.आर.कदम,ग्रंथपाल वामन काटीकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆