एम आय टी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि एम एस डब्ल्यू अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी प्रा चेतन दिवाण यांची नियुक्ती...
=====================================
=====================================
पुणे | दि. 10/06/2022
पुणे येथील एम आय टी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी या जागतिक दर्जाच्या नामांकित विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि एम एस डब्ल्यू अभ्यासक्रम अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा चेतन दिवाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एम आय टी विद्यापीठ हे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम व उपक्रम राबविण्यामध्ये आघाडीवर असून नुकताच त्यांनी मास्टर ऑफ सोशल वर्क (एम एस डब्ल्यू) हा अभ्यासक्रम सुरु केलेला आहे. विविध विषयांचे अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा पद्धती व परीक्षांचे स्वरूप ठरविणे तसेच संबंधित विषयाबाबतीत तज्ञ मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावण्याची मुख्य जबाबदारी ही संबंधित अभ्यासक्रम अभ्यास मंडळांची असल्याने विद्यापीठ स्तरावर अशा पद्धतीची प्रत्येक विषयाची अभ्यास मंडळे स्थापन करण्यात येत असतात.
प्रा चेतन दिवाण हे एक शिक्षणतज्ञ असून कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये व्यावसायिक समाजकार्य, समुपदेशन व मानसिक आरोग्याचे अध्यापन व संशोधन कार्य करतात. प्रा दिवाण हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिव्यांग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे विद्यापरीषद सदस्य देखील आहेत.
प्रा चेतन दिवाण यांच्या या नियुक्तीबद्दल संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक, विश्वस्त संदीप खर्डेकर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विनायक कराळे, उपाध्यक्ष विनय घोरपडे, सचिव एम शिवकुमार, समन्वयक प्रसाद कोल्हटकर, प्र संचालिका डॉ शर्मिला रामटेके, सी एस आर विभागाचे प्रा डॉ महेश ठाकूर, एम आय टी चे डॉ कराड, संचालिका डॉ अनामिका बिश्वास, अभ्यासक्रम समन्वयक प्रा किरण जॉन्सन आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆