=====================================
भिलवडी | दि. १६ ऑगस्ट २०२२
विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून, समाजासमोर नेहमीच एक वेगळा आदर्श ठेवणाऱ्या भिलवडी येथील व्यापारी संघटनेने यावर्षी संपन्न होणाऱ्या भारत देशाच्या अमृत महोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, यावर्षी झालेल्या ध्वजारोहणाचा मान इयत्ता दहावीमध्ये सर्वोत्तम गुण मिळविलेल्या कु. आरती बाबर हिला देऊन, भिलवडी व्यापारी संघटनेने एक नवीन पायंडा पाडला आहे.
त्याचप्रमाणे व्यापाराचे वेळी आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ व प्रसन्न असावा म्हणून भिलवडी व्यापारी संघटनेमार्फत भाजीपाला व हातगाडे व्यापारी यांना स्वच्छतेसाठी कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले.
तत्पूर्वी व्यापारी संघटनेने प्रत्येक दुकानदाराला तिरंगा पोहोच केला तसेच तिरंगा उभारण्यासाठी लागणारी काठीही त्याच सोबत पोहोच केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव देण्यासाठी शालेय विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन, त्याचप्रमाणे शालेय मुला-मुलींसाठी विविध गटांमध्ये धावण्याच्या व सायकल स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये साधारणतः एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेऊन, स्पर्धा हिरीरीने पूर्ण केल्या. सर्व विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले . तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन त्यांना नेहमीच स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. व्यापारी हिताचा दृष्टिकोन लक्षात घेऊन, फायर एक्सटिंग्गुएशरचे वाटप ही व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. भिलवडी परिसरातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित सामाजिक, व राजकीय मान्यवर उपस्थित होते. यामध्ये चितळे उद्योग समूहाचे उद्योजक गिरीश चितळे, माजी संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील , माजी सरपंच विजयकुमार चोपडे, माजी सरपंच धनंजय पाटील, दक्षिण भाग सोसायटीचे चेअरमन गुंडा भाऊ चौगुले, विद्यमान सरपंच सौ विद्याताई पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील, अध्यक्ष सुबोध वाळवेकर, रणजीत पाटील, जावेद तांबोळी, लाला जमादार, राजू तेली, राजेंद्र कोरे यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते.
सध्या बहुतांश मुले ही सतत मोबाईल मध्ये डोकं घालून बसल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते.मैदानी खेळ तर शहरांपाठोपाठ खेडेगावातून ही हद्दपार होत आहेत.त्यामुळे मुलांना खेळातील स्पर्धेमधून आनंद मिळावा.त्यांना नवनवीन खेळ व स्पर्धा याविषयी आकर्षक निर्माण व्हावे हि भुमिका घेवून, व्यापारी संघटनेने विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.त्यास मुलांसह मुलींनी सहभागी होवून दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय होता.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई व पुष्पमालांनी सजावट केली होती. सर्वांच्या देहबोली मधून एक वेगळाच उत्साह दिसून येत होता. भिलवडी येथील मुख्य बाजारपेठे मधील सागर गारमेंट्स या कापड दुकानासमोर केशरी, पांढरी व हिरवी अशा तीन रंगांच्या साड्यांनी साकारलेली राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●