======================================
======================================
सांगली | ता. 07 ऑगस्ट 2022
सांगलीतील ताकारी म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. ताकारी म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे आणि खासगी बांधकाम व्यवसायिक राहुल कणेगावकर यांना एक लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणी सूर्यकांत नलवडे आणि राहुल कणेगावकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कंत्राटदार असून त्यांना कार्यकारी अभियंता ताकारी म्हैशाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग सांगली कार्यालयाकडून ऑनलाईन ई टेंडर व्दारे वारणाली वसाहत अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता, उपहारगृह, दुरूस्ती करीता स्विपर मजुर पुरवणे हे काम मिळाले होते. सदर कामाचा कार्यारंभ आदेश देण्याकरीता श्री. नलवडे, कार्यकारी अभियंता यांनी तक्रारदार यांचेकडे १,००,०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज दि.०१.०८.२०२२ रोजी ॲन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ०५.०८.२०२२ रोजी ब्युरोच्य कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक नलवडे, कार्यकारी अभियंता यांनी तक्रारदार यांना कामाचा
कार्यारंभ आदेश देण्यासाठी एक लाख रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लागलीच ताकारी म्हेशाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, वारणाली सांगली या ठिकणी लोकसेवक नलवडे यांचे विरूध्द सापळा रचला परंतु लोकसेवक नलवडे यांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम राहुल कणेगावकर यांचेकडे देण्यास सांगीतली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लक्ष्मी देऊळा जवळील सह्याद्री कन्स्ट्रकशन या कार्यालयात सापळा लावला असता राहुल कणेगावकर यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून एक लाख रूपये तक्रारदार यांचेकडून स्विकारले नंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
लाचेची मागणी करुन लाच स्वीकारल्या प्रकरणी लोकसेवक सुर्यकांत मारूती नलवडे, वय ५२ वर्ष, कार्यकारी अभियंता, ताकारी म्हैशाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, वारणाली सांगली रा. नानानानी पार्क, आरवाडे पार्क रेल्वे स्टेशनसमोर सांगली व राहुल शिवाजी कणेगावकर वय ३७ वर्ष व्यवसाय कन्स्ट्रक्शन रा. शाहुनगर विजयनगर ता. मिरज जि.सांगली यांचे विरुध्द संजयनगर पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली चे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे ,
पोलीस निरीक्षक विनायक भिलारे ,पोलीस अंमलदार संजय कलगुटगी, सलीम मकानदार, भास्कर भोरे, रविंद्र धुमाळ, सिमा माने, अविनाश सागर, श्रीपती देशपांडे यांनी केली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆