======================================
======================================
अंकलखोप | दि. ०७/०९/२०२२
मी भाजपमध्ये जाणार अशी अफवा काही प्रसार माध्यमामधून पसरवली जात आहे परंतु स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब व आदरणीय मोहनराव कदम (दादा) यांच्या विचारांचा वारसा माझ्याजवळ आहे. मी कोणत्याही वेगळ्या वळणावर जाणार नाही किंवा तसा विचारही करीत नाही असे प्रतिपादन आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी अंकलखोप येथे केले.तसेच मी भाजपमध्ये जाणार हि निव्वळ अफवा असल्याचे सांगून कदम यांनी भाजपा प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
आ.डॉ.विश्वजीत कदम हे काँग्रेसमध्येच राहणार असून, भाजपामध्ये जाणार अशी अफवा काही प्रसारमाध्यमामधून पसरविली जात आहे असे प्रतिपादन आ.बाळासाहेब थोरात यांनी अंकलखोप येथे केले ते अंकलखोप (ता. पलुस) येथील अंकलखोप विकास सोसायटीच्या शताब्दी महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. पुढे बोलताना थोरात म्हणाले की, योगायोगाने अनेक ठिकाणी राजकीय लोक भेटतात. काही मिडीयावाले त्याचे भांडवल करतात. स्व.डॉ पतंगराव कदम यांनी काँग्रेसाचा विचार हाच माझा विचार मानून काम केले. तो पुरोगामी विचार पुढे नेण्याची जबाबदारी डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर आहे. अंकलखोप विकास सोसायटी ही राज्यातील एक मोठी सोसायटी आहे. त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा अवलंब योग्य पध्दतीने करून संस्थेचा, व शेतकरी वर्गाचा फायदा करून दिला आहे. त्यांचा आदर्श आम्ही सुध्दा घेऊन, आमच्या संस्थेत वाटचाल करतो.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. डॉ. विश्वजीत कदम हे होते यावेळी आ. मोहनरावजी कदम, काँग्रेसचे सांगली शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आ. मोहनराव कदम यांच्या हस्ते आज अखेर झालेल्या सर्व अध्यक्ष, सचिव तसेच मयत अध्यक्षांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला तर आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विकास सोसायटीच्या शताब्दी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच संपादक मंडळाचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी जे. के पाटील, बाळासाहेब मगदूम, यांनी मनोगते व्यक्त केली. सोसायटीचे अध्यक्ष विशाल सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.तर आभार संचालक विजय पाटील यांनी मानले.कार्यक्रमास जिल्हा विकास प्रबंधक निलेश चौधरी, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा विशेष लेखापरिक्षक संजय पाटील, सहाय्यक निबंधक अमोल डफळे , दिलीप वाग्यानी , अनिल विभुते, अशोक चौगुले, सुधीर जाधव, आप्पासो सकळे, विशाल सावंत यांच्यासह सर्व संचालक, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆