=====================================
सांगली | दि. 03 नोव्हेंबर 2022
सलगरे ते आरळीहट्टी (कर्नाटक सीमा भाग) हा निकृष रस्ता दुरुस्त व्हावा या मागणीसाठी परिसरातील शेतकरी, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थां यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर धामणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दि.३ पासून आमरण उपोषणास सुरवात केली.
सलगरे हद्दीतील या रस्त्याकडे फक्त सीमाभागातील रस्ता आहे म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या राज्यकर्त्यांचा निषेध करत शेतकरी , शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी सहभागी होत आंदोलनास प्रारंभ केला.
आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातील आशय असा की,
सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील महाराष्ट्र व कर्नाटक राज्य जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. सलगरे हि सांगली जिल्हा पूर्व भागातील मोठी बाजारपेठ आहे. त्या रस्त्याने महाराष्ट्र व कर्नाटकातील २० ते २५ गावातील रहदारी आहे. हा रस्ता सलगरे हद्दीतील अनेक कुटुंबाचा रहदारीचा रस्ता आहे .या रस्त्यावर खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही इतका निकृष्ट रस्ता आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून ओढ्याचे पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. बऱ्याच वर्षापासून हा रस्ता दुर्लक्षित असल्यामुळे सलगरे व सलगरे परिसरातील शेतकरी, व्यापारी , विद्यार्थी व ग्रामस्त यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे. हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी सलगरे ग्रामपंचायतिच्या वतीने सुद्धा बऱ्याच वेळा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. त्याच बरोबर परिसरातील नागरिकांनीही तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. सरकार कुणाचे हि असो सत्ताधारी व विरोधकांना सुद्धा सीमा भागातील नागरिकांचे देणे घेणे नाही. वर्षानुवर्षे शालेय विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्त आजारी रुग्ण तारेवरची कसरत करत या रत्याने वाटचाल करीत आहेत. कित्येकवेळ या निकृष्ट रस्यावर अपघात झाले आहेत. रस्यावरील धुळीमुळे श्वसनाच्या आजाराचा सामना जनतेला करावा लागत आहे.या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पिकांवर धुळीचे साम्राज्य माखून पिकांचे नुकसान होत आहे.
सातत्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आताचे पालकमंत्री ना.सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातील शेतकरी, विद्यार्थी व जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याने, पालकमंत्र्यांनी रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी निवेदनाद्वारे आंदोलकांनी केली आहे. रस्त्याचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहील असे उपोषणकर्ते नंदकिशोर धामणे यांनी सांगितले.
आम्हाला खड्ड्यातून, चिखलातून शाळेला जावे लागते, आमच्याकडे पालकमंत्री लक्ष देतील का ?, रस्त्यावरील धुळीमुळे श्वसनाच्या त्रास होतोय, पालकमंत्री लक्ष देतील का ?, धुळी मुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पिकांवर धूळ साचून पिकांचे नुकसान होते, राज्यकर्ते लक्ष देतील का ?, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहेत, जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या जनतेकडे राज्यकर्ते लक्ष देतील का?, आमचे मतदान महाराष्ट्रातील आमदार, खासदार, जिप सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत निवडणुकीला चालते, तरीही राज्यकर्त्यांचे सीमाभाग म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष का ?, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री महोदय नुसते सिमाभाभगतील मराठी जनतेवर प्रेम असण्याचे नाटक करू नका, आम्ही महाराष्ट्रातीलच आहोत, आमच्याकडेही लक्ष द्या असा मजकूर असणारे बोर्ड घेऊन विद्यार्थ्यांसह, शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. या मागणीसाठी आंदोलनस्थळी सलगरे चे सरपंच तानाजी पाटील यांनीही उपस्थिती लावली, या प्रश्नासाठी प्रशासनाकडे सलगरे ग्रामपंचायतीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला आहे पण यश आले नसल्याचे सांगितले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆