=====================================
=====================================
जत | दि. २७ नोव्हेंबर २०२२
जत : खरे सुख हे दु:खाच्या प्रसंगी दुसऱ्यांचे अश्रू पुसण्यात आहे.आपल्या भोवती असणाऱ्या लोकांना आनंद देण्यात आहे.अपेक्षांचे ओझे वाढले की माणूस खऱ्या सुखापासून दुरावत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व हास्ययात्राकार शरद जाधव (धनगांव) यांनी केले.
मराठा मंदिर मुंबई संचलित श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल आयोजित श्री ज्ञानेश्वर स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना सुख म्हणजे नक्की काय असतं ! या विषयावर ते बोलत होते.
कुमारी वैष्णवी माळी हिने गायलेल्या कानडा राजा पंढरीचा या भक्ती गीताने व्याख्यानमालेची सुरुवात झाली.प्रारंभी शरद जाधव यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी शरद जाधव म्हणाले की, आई वडील मुलावर अपेक्षांचे ओझे लादतात. त्या ओझ्याखाली मुलं दबतात.कृत्रिमरीत्या वागतात व खऱ्या सुखापासून वंचित राहतात. खरं सुख स्वतःवर व जीवनावर प्रेम करण्यात आहे. आज माणूस हसणे विसरत चालला आहे. तणाव मुक्तीसाठी हसणं गरजेचं आहे. कामात सतत व्यस्त राहणे,व्याधीमुक्त जगणे, सकारात्मक विचार करणे व संघर्ष करणे यातच खरे सुख असते. बाह्यरूपापेक्षा अंतरिक सौंदर्यावर प्रेम करावे.मनुष्य जीवन जगताना दोन प्रकारची सुखे अनुभवतो. एक शाश्वत व दुसरे अशाश्वत. शाश्वत सुख हे अध्यात्मिक असते व त्यातून माणसांना सुखप्राप्ती होते.अशाश्वत सुख हे भौतिक सुविधातून मिळते व ते मृगजळाप्रमाणे असते.टी.व्ही. मालिकांचा व सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे तरुण पिढी आज भारतीय संस्कृती पासून दूर चालली आहे. त्यासाठी तरुण पिढीने याचा मर्यादित वापर करून आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचे काम करावे असे आवाहनही जाधव यांनी केले.
प्रास्ताविक प्राचार्य शिवाजी शिंदे यांनी केले. पांडुरंग साळुंखे यांनी शरद जाधव यांचा परिचय करून दिला.सूत्रसंचालन संभाजी सरक यांनी केले.
व्याख्यानमालेचे प्रायोजक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, प्रगतशील शेतकरी शशिकांत काळगी, विवेकानंद करिअर अकॅडमीच्या संचालिका सौ.उज्वला बोबडे,जत दूरदर्शन परिवाराचे अध्यक्ष दीपकराव शिंदे,सुभाष कवडे यांचा सत्कार करण्यातआला.
व्याख्यानमालेस माजी प्राचार्य श्रीपाद जोशी,प्रमोद पोतणीस, केशव सुर्वे, केंद्रप्रमुख जयवंत वळवी,प्रभाकर भाऊ जाधव, शालेय समितीचे निमंत्रित सदस्य शहाजीराव भोसले, रामचंद्र शितोळे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पसायदानाने व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाची सांगता झाली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆