👇
====================================
====================================
भिलवडी | दि.25 डिसेंबर 2022
पलूस तालुक्यातील माळवाडी गावामध्ये कॉलरा सदृश्य साथ पसरली असल्याची चर्चा सर्वत्र होत असल्याने,नुकतेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सांगली डॉ. दिलीप माने यांनी माळवाडी गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सर्व परिस्थितीची पाहणी केल्यानंतर या भागामध्ये कोणताही रुग्ण कॉलरा बाधित नसल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. माने यांनी जाहीर केल्याने कॉलरा साथीबाबत होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
माळवाडी येथे कॉलरा सदृश्य आजार पसरत असल्याची चर्चा सर्वत्र होत होती. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडीच्या वतीने माळवाडी गावचे सर्वेक्षण करून, संबंधित आजाराची लक्षणे असणाऱ्या लोकांची तपासणी केली. यामध्ये कोणतीही व्यक्ती कॉलरा सदृश्य साथीने ग्रस्त असल्याचे दिसून आले नाही.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सांगली डॉ.दिलीप माने यांनी ही तातडीने माळवाडी गावास भेट देऊन, परिस्थितीची पाहणी केली तसेच कॉलरा सदृश्य आजार टाळण्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले व या भागांमध्ये सध्या तरी कोणताही रुग्ण कॉलरा बाधित नसल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोफीया शेख, डॉ. अविनाश पाटील यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆