=====================================
=====================================
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करा : अमोल वेटम
बेताल वक्तव्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात , विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यावे..
सांगली | दि. ११ डिसेंबर २०२२
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे भरसभेत कर्मवीर भाऊराव पाटील, जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भिक मागून शिक्षण संस्था उभ्या केल्या असे संतापजनक वक्तव्य केल्याने व यातून तमाम नागरिकांच्या भावना दुखावल्या असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी केली.
ज्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यास भिक आणि लोकवर्गणी यातील फरक समजत नाही, अशा व्यक्ती सदर मंत्री पदास लायक नाही, त्यांना तत्काळ हटविण्यात यावे. बेताल वक्तव्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. वाढती बेरोजगारी , नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांना बगल देण्यासाठी कधी राज्यपाल तर कधी भाजप नेते महापुरुषांचा अपमान करत असतात , तर कधी सीमा वाद उकरून काढले जातात. याचा आम्ही निषेध करतो.
लोकांनी शासनाच्या निधी वर अबलंबून राहू नये असे चंद्रकांत पाटील म्हणतात. राज्यातील शिक्षण विभाग चालविण्यास सरकार असमर्थ असेल तर त्यांनी शिक्षण कर घेणे थांबवावे. नुकतेच भाजपने जैन, मुस्लिम, बौध्द, शीख, ख्रिश्चन, पारसी आदी अल्पसंख्याक समूहाचे मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप बंद केले आहे, यातून उच्च शिक्षणाची दारे बंद केली आहे. मनुस्मृतीचे पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे, असे वेटम म्हणाले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆