======================================
======================================
भिलवडी | दि. १७ जानेवारी २०२३
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गांजाची अवैधरीत्या साठवण करून, त्याची विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व भिलवडी पोलीस ठाणे यांनी अटक केली.
अजिंक्य विजय जाधव (वय ३०), संदीप पिलाजी यादव (वय २७, दोघेही रा. आळसंद, ता. खानापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांचे कडून मिळालेल्या माहितीनुसार,
सांगली जिल्ह्यात गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांवर कारवाई करण्याबाबत
पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांना सुचना दिल्या होत्या.
वरिष्ठ अधिकारी यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करून सांगली जिल्ह्यात गांजा विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.
नेमणूक करण्यात आलेल्या पथकाने सांगली जिल्ह्यात गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवरती लक्ष केंद्रीत करून गुप्त बातमीदारा मार्फत माहिती घेतली असता, संदीप पाटील व बिरोबा नरळे यांना माहिती मिळाली की, भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये आमणापूर रोड, नवले हॉल जवळ दोन संशयित इसम होन्डा शाईन मोटार सायकल वरुन गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत.
गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आमणापूर रोड, नवले हॉल जवळ सापळा लावून थांबले असता, दोन संशयित इसम बिना नंबर प्लेटची होन्डा शाईन मोटर सायकल घेऊन येताना दिसले. त्यांचा संशय आल्यामुळे त्यांना थांबवून त्यांच्याकडे असलेली लाल रंगाची पिशवी व मोटरसायकलसह त्यांना पकडले.
त्याच्याकडून ताब्यात घेतलेल्या लाल रंगाच्या पिशवीमध्ये खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेले ८ बंडल मिळाले त्यापकी एक बंडल उचकटुन पाहिले असता त्यामध्ये हिरवट रंगाचा गांजा असल्याचे लक्षात आले.
सा.पो. नि.नितीन सावंत व सा.पो.नि.प्रशांत निशानदार यांनी त्यांची कसून चौकशी केली असता ते दोघेही समाधानकारक माहिती सांगत नव्हते त्यावेळी त्या दोघांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरच्या पिशवीमध्ये गांजा असुन तो ग्राहक बघून विक्री करण्यासाठी आणला असल्याचे सागितले.
या दोन सराईत गुन्हेगारांकडून ८ किलो वजनाचा गांजा व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली होन्डा शाईन कंपनीची मोटार सायकल असा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून त्यांचेवरती गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८ क २० (ब) प्रमाणे भिलवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे , स.पो.नि प्रशांत निशानदार , संदीप पाटील, बिरोबा नरळे, जितु जाधव, सागर लवटे , संतोष गळवे , विक्रम खोत, ऋतुराज होळकर , भिलवडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. नितीन सावंत , चंदू कोळी , मारुती मस्के, मंगेश गुरव, रोहित माने, अय्याज शेख , प्रविण सुतार यांनी केली.
सदर गुन्हयातील हे दोन्ही आरोपी व मुद्देमाल पुढील गुन्हयाचे तपास कामी भिलवडी पोलीस ठाणे कडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास भिलवडी पोलीस ठाणे करीत आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆