======================================
======================================
कुंडल | दि.२३ फेब्रुवारी २०२३
मुलं पालकांपासून दुरावली जात आहेत त्यांना पालकांच्या जवळ आणण्यासाठी कुंडल ( ता पलूस) येथील प्राथमिक विद्यालयाने मातृ-पितृची पाद्य पूजन हा अत्यंत भावनिक समारंभ आयोजित केला होता.
औचित्य होते कुंडल (ता पलूस) येथील प्राथमिक विद्यालयात विशेष मातृ पितृ पूजन कार्यक्रम. आमदार अरुणअण्णा लाड अध्यक्षस्थानी होते तर मुख्याध्यापिका विजयाताई पवार यांनी हा सोहळा घडवून आणला.
या सोहळ्यावेळी अनेक पालकांच्या अश्रू अनावर झाले तर अनेक पालकांच्या अंगावर शहारे उभे राहिले कारण आजवर ज्या मुलांची सेवा केली ती मुलं आपली सेवा करताना पालकांचे उर भरून आले होते.
जन्मदात्यांच्या उपकरातून उतराई जरी होता येत नसले तरी त्यांनी दाखवलेल्या दुनियेबद्दल आभार मानण्याचे राहूनच जातं, म्हणून हा सोहळा येथे आयोजित केला होता.
यावेळी आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, एकत्र कुटुंबात जेष्ठांच्या अनुभवाची शिदोरी मिळाल्याने मुलांवर चांगले संस्कार होत होते आता तसे दिसत नाही मुलांना संस्कारक्षम घडवले तर भावी पिढीही सुसंस्कारित होईल यासाठी असे उपक्रम प्रत्येक शाळेत वर्षातून एकदा होणे गरजेचे आहे.मुलं हीच खरी संपत्ती समजून ती वाढवा असे आवाहन पालकांना त्यांनी केले तर मुलांनी भक्त कुंडलिक होऊन आई वडिलांची सेवा केली तर आयुष्यात काहीही कमी पडणार नसल्याचे सांगितले.
पालकांनी आपापल्या पाल्याकडून स्वतःचे पूजन करून घेताना त्यांनी मुलांबाबत केलेल्या त्यागामुळे अश्रू अनावर झालेच होते. कार्यक्रमात अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, परिस्थतीत कसलीही असली तरी मुलं मोठी करण्यासाठी आपण झिजत असतो हे करताना पाल्य कितीही मोठा झाला तरी त्याची आई वडिलांशी नाळ तुटू नये यासाठी जीवाचे रान करत असताना त्याचे आज फलित झाल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी कथाकथनकार गणेश खारगे यांनी आई वडिलांची महती सांगताना मुलं कितीही मोठी झाली तरी पालक स्वतः झिजतील, संपतील पण मुलांना कसलीही झळ लागू देत नाहीत यासाठी मुलं हीच आपली संपत्ती आहे ती वाढवा असा उपदेश कवितेतून दिला.
यावेळी दिनकर लाड, अशोक पवार, वसंत लाड यांचेसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆●◆●◆◆◆●◆●◆●◆
◆●◆●◆●◆●◆◆◆●◆◆◆◆◆●◆◆◆●◆●◆●◆●◆●◆