लॉ परीक्षा बाबत गोंधळ सुरूच, युजीसी नियमानुसार ९० दिवस अध्यापन पूर्ण नाही
======================================
======================================
सांगली दि.०५ : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत प्रथम वर्ष लॉ (तीन व पाच वर्ष कोर्स) अभ्यासक्रमाचा निकाल दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आला . यांनतर द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. दि.२३ जानेवारी पासून नियमित वर्ग भरण्यास सुरू झाले. असे असताना शासकीय सुट्टया सोडून ९० दिवस अध्यापन होणे युजीसी नियमनुसार बंधनकारक आहे. तसे होताना दिसत नाही. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापनचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव यांनी हिवाळी सत्र परीक्षा बाबत दिनांक ०२ मार्च रोजी लेखी आदेश / परिपत्रक काढून सेमीस्टर १ आणि ३ (तीन व पाच वर्ष लॉ कोर्स) यांच्या परीक्षा ३१ मार्च, १ एप्रिल रोजी प्रारंभ होणार असल्याचे जाहीर केले. जख्म डोक्याला इलाज पायाला अशी गत पहावयास मिळत आहे. अजूनही ९० दिवसाचे अध्यापन पूर्ण झाले नसताना सदर परिपत्रक जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप असल्याची माहिती रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी दिली.
'आधी कळस मग पाया ' विद्यापीठाचा गलथान कारभार: अमोल वेटम
दिनांक २८ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाने एक परिपत्रक काढून नवीन सत्र प्रारंभ तारीख ही ०१ डिसेंबर २०२२ असल्याचे जाहीर केले. हे परिपत्रक नोव्हेंबर महिन्यात जाहीर करणे अपेक्षित होते, पण जाहीर मात्र फेब्रुवारी २०२३ रोजी केले. या अनागोंदी कारभाराची व परिपत्रकाची सर्वत्र चर्चा होत आहे याचा निषेध केला जात आहे. हे परिपत्रक म्हणजे 'आधी कळस मग पाया' अशी अवस्था विद्यापीठाने करून ठेवली आहे. यात विद्यार्थ्यांचा नाहक बळी दिला जात आहे. याचा आम्ही निषेध करतो. तरी ९० दिवस अध्यापन झाल्याशिवाय परीक्षा घेण्यात येऊ नये, हे परिपत्रक तत्काळ रद्द करण्यात यावे , अन्यथा विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. असा इशारा वेटम यांनी दिला.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆