yuva MAharashtra वावटळीने दोन वर्षांची मुलगी हवेत उडाली, जागेवरच झाला मृत्यू..

वावटळीने दोन वर्षांची मुलगी हवेत उडाली, जागेवरच झाला मृत्यू..



======================================
======================================

सांगोला | दि. २७ एप्रिल २०२३
--------------------------------------------------------------------

सांगोला तालुक्यातील जवळा गावाजवळ जवळा घेरडी रोडच्या बाजूला जिल्हा परिषद शाळेजवळ पाल टाकून राहत असलेल्या मरीआई गाडीवाले कुटुंबावर काळाने घाला घातला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 

जवळा येथील वडिलांकडे दवाखान्याला आलेल्या लेकीच्या दोन वर्षाच्या मुलीचा झोपाळा सोसाट्याच्या वाऱ्याच्या वावटळीने हवेतून पाला पासून बऱ्याच लांब उडून जावून दगडावर आदळून दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवार दि.२७ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजनेच्या सुमारास घडली आहे.

सोनंद (ता.सांगोला) येथील साधू चव्हाण यांची दोन वर्षाची कन्या कस्तुरी साधू चव्हाण असे मृत्यू  झालेल्या बालिकेचे नाव आहे. 


साधू चव्हाण यांची सासुरवाडी जवळा आहे. जवळा येथील दवाखान्यात उपचारासाठी त्यांच्या पत्नी आपल्या  कन्येला घेवून वडीलांच्याकडे जवळा येथे आल्या होत्या. गुरुवारी दुपारी अडीच वाजनेच्या सुमारास दवाखान्यातून पालावर आल्यावर त्यांनी मुलीला जेवण दिले व नंतर पालातील साडीच्या झोपाळ्यात झोपविले होते.

दरम्यान दुपारच्या वेळेत ऊन्हाचा कडाका होता. त्यातच अचानकच वातावरणात बदल झाला आणि जोरात वारा सुटला या वाऱ्यामुळे पालातील  झोपाळा मुलीसह उंच हवेत उडाला. पालात असलेले  सर्व लोक तिला वाचवण्यासाठी तिच्याकडे धावले. मात्र, ही चिमुरडी जोरात जमिनीवर दगडावर आदळली आणि तिच्या डोक्याला जोराचा मार लागला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

हि घटना झपाट्याने परीसरात पसरली आणि परीसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. तिचा मृतदेह पाहून महिलांनी हंबरडा फोडला.


क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले,
कुटुंबातील सर्वांची लाडकी असलेली कस्तुरी ही दुपारी जेवण करून झोपडीत असलेल्या साडीच्या झोळीत गाड झोपी गेली होती. बाहेर कडाक्याचे उन्ह होते. अंगाची लाहीलाही होत होती. मात्र झोपडीच्या सावलीत ही चिमुरडी झोपी गेली. काही वेळातच जोरात वावटळ आले. या वावटळीने झोपाळा मुलगी सह हवेतून लांब उडून जावून दगडावर आदळला. या घटनेत तिचा जागीच  मृत्यु झाला.
 
 हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने जवळा तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 सोसाट्याच्या वाऱ्याने ही दुर्घटना घडलेली आहे. याबाबत महसूल यंत्रणेनी पंचनामा केला आहे. सांगोला पोलीसातही याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.


तात्काळ आर्थिक मदत द्या.. राजाभाऊ गुजले 

सोनंद येथील मरीआई गाडीवाले साधू चव्हाण यांच्या दोन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पालात बांधलेला साडीचा झोपाळा सोसाट्याच्या वाऱ्याच्या वावटळीने मुलीसह हवेतून बऱ्याच अंतरावर लांब उडून जावून दगडावर आदळल्यामुळे त्या दोन वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यु झाला आहे. चव्हाण कुटुंबावर आलेली हि नैसर्गिक आपत्ती आहे. या कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
 या दु:खी, गरीब  कुटुंबाला शासना कडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गुजले  यांनी केली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆