yuva MAharashtra देशी बनावटीचे ७ पिस्टल, १७ काडतुसे, नशेच्या गोळया , गांजा असा एकूण ०९.६७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ......०४ गुन्हे दाखल , ०६ आरोपी जेरबंद

देशी बनावटीचे ७ पिस्टल, १७ काडतुसे, नशेच्या गोळया , गांजा असा एकूण ०९.६७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ......०४ गुन्हे दाखल , ०६ आरोपी जेरबंद



======================================
======================================



सांगली : दि. ०७ मे २०२३

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रे, नशिले पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सांगली, मिरज येथे LCB केलेल्या कारवाईत एकूण ०६ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून देशी बनावटीची ०७ पिस्तूल , १७ जिवंत काडतुसे , २२८ नशेच्या गोळ्या , १२०० ग्रॅम वजनाचा गांजा , गुन्ह्यात वापरलेली स्विप्ट डिझायर कार आणि ०२ मोबाईल असा तब्बल 9.67 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती LCB चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. LCB च्या दोन पथकांनी ही कारवाई केली.

१) शांताराम बसवन्त शिंदे (वय 27, रा. आसंगी तुर्क, ता. जत) २) सौरभ रवींद्र कुकडे (वय 24, रा. दत्तनगर, कर्नाळ रोड, सांगली) ३) राहुल सतीश माने (वय 30, रा. वसंतदादा सोसायटी, मिरज) ४) वैभव राजाराम आवळे (वय 25, रा. हडको कॉलनी, मिरज) ५) सुरेश लक्ष्मण राठोड (वय 42, रा. आलियाबद, जि. विजापूर) ६) सूरज संभाजी महापुरे (वय 25, रा. दिघंची, ता. आटपाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.



कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सीमाभागात तसेच जिल्ह्यात कडक वॉच ठेवून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी बेकायदा शस्त्रे बाळगणारे, नशिले पदार्थ बाळगून त्याचे सेवन, विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार LCB चे पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांची दोन विशेष पथके तयार केली होती.

सहायक निरीक्षक शिंदे यांचे पथक सांगलीत गस्त घालत असताना छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात शांताराम शिंदे, सौरभ कुकडे संशयास्पदरित्या फिरताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे ०१ पिस्तुल, ०३ काडतुसे सापडली. त्यांना अटक करण्यात आली. तर मिरजेतील विद्यानगर रोड परिसरात कोंबिंग ऑपरेशन करत असताना राहुल माने याच्याकडे चौकशी करून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ०२ पिस्तुल, ०५ काडतुसे, नायट्रोव्हेटच्या नशेच्या गोळ्या, १२०० ग्रॅम गांजा सापडला. तो मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली.

सहायक निरीक्षक शिंदे यांचे पथक मिरज-पंढरपुर रस्त्यावर गस्त घालत असताना साळुंखे कॉलेजजवळ वैभव आवळे, सुरेश राठोड एका मारुती कारमध्ये (क्र. KA 28 Z 2238 ) संशयास्पदरित्या थांबले होते. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतल्यानंतर ०३ पिस्तुल, ०७ काडतुसे सापडली सदर पथकाने कारसह मुद्देमाल ताब्यात घेऊन दोघांना अटक केली. सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे पथक सांगली शहरात गस्त घालत असताना विश्रामबाग रेल्वे स्थानक परिसरात सूरज महापुरे संशयास्पदरित्या फिरत होता. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ०१ पिस्तुल, ०२ काडतुसे सापडली. त्याला अटक करून पथकाने मुद्देमाल जप्त केला.


LCB चे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकातील संदिप पाटील, मच्छिन्द्र बर्डे, संजय कांबळे, गौतम कांबळे, संकेत कानडे, आर्यन देशिंगकर, विक्रम खोत, संतोष गळवे, विमल नंदगावे आदींच्या पथकाने तीन ठिकाणी कारवाई केली. तर सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या पथकातील मेघराज रुपनर, दीपक गायकवाड, सचिन धोत्रे, संदीप नलवडे, चेतन महाजन, वनिता धुमाळ आदींच्या पथकाने कारवाई केली.

           
    ---- तिघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार ----

अटक केलेल्या ०६ जणांपैकी तिघेजण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यामध्ये १) सौरभ कुकडे २) राहुल माने ३) सुरेश राठोड (विजापूर) यांचा समावेश आहे. या तिघांवर दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆