yuva MAharashtra जखमी काळवीटावर प्रथमोपचार करून वन्यजीव रक्षक अरुण शेवाणे यांनी दिले जीवदान

जखमी काळवीटावर प्रथमोपचार करून वन्यजीव रक्षक अरुण शेवाणे यांनी दिले जीवदान



                               व्हिडीओ
                                👇


======================================
======================================
 
अंजनगाव सुर्जी :            दि. १७ जून २०२३

आज शनिवार दि.१७ रोजी पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा कुत्र्यांनी एका अंदाजे तीन वर्षीय काळवीटाला जखमी केल्याची माहिती कापुसतळणी येथील वन्यजीव रक्षक अरुण शेवाणे यांना मिळताच त्यांनी लगेच आपल्या दुचाकीवर त्या जखमी काळवीटावर प्रथमोपचार करून त्याला जीवदान दिल्याची माहिती उघडकीस आली.
             प्राप्त माहितीनुसार अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मौजा पोही शेत शिवारातील पोही- रत्नापूर रस्त्याला लागून गवई फार्म हाऊस जवळ वीस पंचवीस हरणांचा कळप जात असतांना त्या कळपातील एका मोठ्या तीन वर्षीय काळवीटावर पाच ते सहा कुत्र्यांनी हल्ला चढविला. ही बाब तेथील उपस्थित असलेले शेतकरी शेतमजुर प्रमोद घडेकर, हरिदास इंगोले, आदर्श तायडे, नारायण घडेकर, इत्यादींनी त्या काळविटाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. व लगेच कापुसतळणी येथील पक्षीमित्र तथा वन्यजीव रक्षक अरुण शेवाणे यांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली.अरुण शेवाणे यांनी क्षणाचाही विलंब न करता  प्रदीप सातवटे यांना सोबत घेऊन त्या जखमी काळविटाला स्वतःच्या  दुचाकीवर घेऊन कापुसतळणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधोपचार करून घेतला. आणि परतवाडा येथील वनविभागाचे वनरक्षक जे. आर.पालियाड यांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. 


अरुण शेवाणे यांनी जखमी अवस्थेत असलेले काळवीट वनरक्षक पालियाड यांच्या स्वाधीन केले. त्यांनी ते जखमी काळवीट वन्यजीव रक्षक बचाव गाडीमध्ये घेऊन गेले. अरुण शेवाणे यांचे सततच्या कार्याबद्दल वनरक्षक पालियाड यांनी धन्यवाद व्यक्त केले. मुक्या प्राण्यांबद्दल येवढे मोठे भावनात्मक नाते असल्याचे अरुण शेवाणे यांनी पुन्हा सिद्ध केल्याचे पहावयास मिळाले अशी परिसरात चर्चा होत आहे. मागील तीन-चार वर्षापासून आतापर्यंत अशाच प्रकारे पंधरा-वीस वन्य प्राण्यांना अरुण शेवाणे यांनी जीवदान दिले हे विशेष. या कार्याबद्दल त्यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆