============================================================================
भिलवडी : वार्ताहर दि. ०६ जुलै २०२३
भिलवडी : पलूस तालुक्यातील माळवाडी गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी (मरिआई) देवीची यात्रा सालाबादप्रमाणे आज गुरुवार दि. ०६ / ०७ / २०२३ पासून उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे.
आज सायंकाळी ४:०० वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीचा पालखी सोहळा होणार असून उद्या सकाळी ९:०० वाजता देवीला पाणी आणण्याचा कार्यक्रम होणार आहे असे यात्रा कमिटी कडून सांगण्यात आले आहे.
गावातील इडा पीडा दूर सारणाऱ्या मरीआई देवीच्या या यात्रोत्सवात गावातील पुरुष , महिला , युवक , वृद्ध स्वयंपूर्तीने सहभागी होत असतात.
या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे देवीचे पाणी..
गावातील व परीसरातील सर्व भाविक भक्त एकत्र येऊन पोतराजांच्या गाण्याच्या तालावर व विविध वाद्यांच्या गजरात भिलवडी येथे कृष्णा नदीच्या घाटावर जाऊन कृष्णेचे पाणी आणून मरीआई देवीसह गावातील सर्व देवांना पाणी घालण्याची परंपरा आहे. देवीचे पाणी पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी अनेक भागातून भाविक भक्त येतात.
देवीला पाणी आणायला जाणाऱ्या नागरिकांच्यामधे विशेषतः युवकांच्या मध्ये एक वेगळाच आनंद व उत्साह असतो.
गावातील बागडी तांबट , मातंग , रामोशी व चर्मकार समाजात मरीआई देवीचे देवस्थान आहेत. पूर्वी या समाजातील लोक आपापल्या परीने समाज मर्यादित यात्रा करीत असत .
परंतु अलीकडच्या काळामध्ये गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ही यात्रा मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरी करतात.
आज पासून सुरू होणाऱ्या यात्रेसाठी मंदिर परिसरात हॉटेल्स,झुले पाळणे,खेळणी दुकाने,संसारोपयोगी साहित्यांचे दुकाने थाटण्याची व्यवसायिकांची लगबग सुरू झाली आहे.
यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोयी होऊ नये यासाठी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत प्रशासना कडून सर्व काही उपाययोजना केल्या जात आहेत.
यात्रा काळात कायदा सुव्यवस्थेचे पालन करून यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन यात्रा कमिटी व भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆