yuva MAharashtra रुग्णांची निस्वार्थ सेवा करणारा 'रुग्णमित्र' ; आशिष उर्फ सनी गायकवाड ठरतोय अनेक रुग्णांसाठी देवदूत..

रुग्णांची निस्वार्थ सेवा करणारा 'रुग्णमित्र' ; आशिष उर्फ सनी गायकवाड ठरतोय अनेक रुग्णांसाठी देवदूत..



======================================
======================================


रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानत आयुष्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवेसाठी झटणारे पलूस तालुक्यातील कृष्णाकाठचा 'रुग्णमित्र'  आशिष उर्फ सनी गायकवाड यांच्या अतुलनिय सामाजिक कार्याला सलाम...

भिलवडी : वार्ताहर                    दि. १९ जुलै २०२३

 सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी गावांसह परिसरामध्ये भिलवडी येथील रूग्णवाहिका चालक आशिष उर्फ सनी गायकवाड यांचे नाव सतत चर्चेत येत असून , हा युवक कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता भिलवडी व परिसरात कोणत्याही प्रकारचा अपघात घडला अथवा एखादा रूग्ण अतिगंभीर अवस्थेत असल्याचे समजल्यास हा युवक रात्रीअपरात्री वेळेची तमा न बाळगता तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन स्वता संबंधित रूग्णांना तात्काळ रूग्णवाहिकेत घालून, दवाखान्यांमध्ये दाखल करतो. 


नुकतेच
लता शशिकांत सपकाळ वय वर्षे ५५ रा.कुची ता.कवठे महांकाळ जि.सांगली या मुलगा महादेव शशिकांत सपकाळ वय वर्षे २९ याच्यासह शुक्रवार दि.१४ जुलै रोजी सकाळी साडेआकरा च्या सुमारास भिलवडीहून दुचाकी वरून कुची गावाकडे जात असताना, माळवाडी मुख्य चौकापासून काही अंतरावर तासगाव मार्गावर लता सपकाळ या चालत्या गाडीवरून अचानक खाली रस्त्यावर पडल्या.त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवू लागला.हातापायालाही मुका मार लागला होता.त्यांना तातडीने भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्राथमिक उपचारासाठी आणले असता त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने सांगलीला घेऊन जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी यांनी दिला. त्यानंतर संबंधितांच्या नातेवाईकांनी रूग्णवाहिका चालक आशिष उर्फ सनी गायकवाड यांना याबाबतची माहिती दिली.त्यानंतर गायकवाड हे तात्काळ रूग्णवाहिकेसह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले.त्यानंतर त्यांनी जखमी लता सपकाळ यांना नातेवाईकांच्या मदतीने रूग्णवाहिकेत घालून, तात्काळ सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले.


आशिष उर्फ सनी यांनी यापूर्वी देखील अनेक अपघातग्रस्त जखमींना तसेच परिसरातील अनेक रूग्णांना समयसुचकता दाखवून, वेळेत दवाखान्यात घेऊन जावून, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न केले आहेत.भिलवडी परिसराला खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून मिळालेली रूग्णवाहिका भिलवडी परिसरातील रूग्णांना मोफत पुरविण्यात येत आहे यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांचे मोठे योगदान असून, आशिष उर्फ सनी गायकवाड कोणत्याही मोबदल्याशिवाय  रूग्णांना अपघात स्थळापासून ते दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यापर्यंत करीत असलेली धडपड ही कौतुकाची बाब आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆