======================================
कुंडल : वार्ताहर दि. ०२ ऑगस्ट २०२३
थोर विचारवंतांच्यामुळे महाराष्ट्राच्या मातीला वेगळी ओळख आहे, देशातील कोणत्याही कोपऱ्यात महाराष्ट्राचे नाव आदराने घेतले जाते कारण या थोर विचारवंतांनी येथे वैचारिक पेरणी केली आहे.
असे प्रतिपादन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले ते क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक आणि राजारामबापू पाटील यांना अभिवादन करतेवेळी बोलत होते.
आमदार लाड म्हणाले, आण्णा भाऊ साठे हे लोकलेखक, लोकशाहीर, लोककलावंत होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यउत्तर कालखंडाचे ते साक्षीदार होते. सध्याच्या समाजस्थितीचा विचार करता आण्णा भाऊ यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात.
टिळकांविषयी बोलताना म्हणाले, लोकमान्य टिळकांनी शतकापूर्वी स्वदेश हितरक्षणाच्या दृष्टीने विचार केला होता. स्वदेशीचा अंमल राष्ट्रीय शिक्षणाशिवाय व्यर्थ असल्याचे जाणून त्यांनी पहिला आग्रह धरला तो राष्ट्रीय शिक्षणाचा.
राजारामबापू पाटील यांच्याबाबत बोलताना म्हणाले, राजारामबापू हे एक लोकनेते होते त्यांनी सहकाराचे रोपटे लावताना प्रत्येक घराचे दरडोई उत्पन्न वाढावे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावे हाच हेतू ठेवला होता. खूजगाव धरणासाठी आग्रह धरून त्यांनी संपूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावली होती ते धर जर आज असते तर जिल्ह्यातील दुष्काळी भागात सुकाळ झाला असता.
यावेळी कारखाना कर्मचाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक आणि राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक आणि राजारामबापू पाटील यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड यांनी पुष्प वाहून अभिवादन केले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆