yuva MAharashtra भिलवडी व माळवाडी परिसरात बेवारस कुत्र्यांचा सुळसुळाट..

भिलवडी व माळवाडी परिसरात बेवारस कुत्र्यांचा सुळसुळाट..



=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर                     दि. ६ ऑगस्ट २०२३

भिलवडी व माळवाडी परिसरातील नागरिक बेवारस कुत्र्यांच्या सुळसुळाटाने त्रस्त झाले आहेत. रात्रभर भुंकणे आणि दिवसा वाहनधारकांच्या मागे धावणे, पादचाऱ्यांवर गुरगुरणे हाच त्यांचा दिनक्रम असतो. संबधित प्रशासनाने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त नागरिक करत आहेत.
बेवारस कुत्रे हा भिलवडी व माळवाडी परीसरातील नागरिकांचा एक गंभीर प्रश्न बनला आहे. दिवसेंदिवस बेवारस कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नक्की हे मोकाट कुत्रे येतात तरी कुटून कि, यांना कोणीतरी येथे आणून सोडतात ? हा संशोधनाचा विषय बनला आहे. 


नागरिकांवर , जनावरांवर हल्ले करण्यापर्यंत या मोकाट कुत्र्यांची मजल गेली आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी, रस्त्यावरून जाणारे नागरिक, दुचाकीधारक, सायकलस्वार यांना या मोकाट कुत्र्यांच्याकडून लक्ष केले जाते. बऱ्याचदा घाबरून वाहनधारकांचे अपघातही होतात. विशेष म्हणजे हे सर्व कुत्रे एकत्र समूहाने वावरताना दिसतात. या समूहांनी स्वत:च्या हद्दी बनविलेल्या असतात. एकमेकांच्या हद्दीत आलेल्या कुत्र्यांवर हे समूहाने हल्ला सुरु करतात. रात्रभर एकमेकांवर भुंकत नागरिकांच्या झोपा उडविण्याचे काम करतात तर दिवसा पादचाऱ्यांना त्रस्त करतात.


पाण्याची टाकी ,रस्त्याकडेला उभा असलेल्या चारचाकी वाहनांच्या खाली , सरळी ओढ्यावरील पुलाच्या खाली आणि कचरा डेपोजवळ कचरा डेपो जवळ यांचा दिवसा यांचा मुक्काम असतो. आणि रात्रीच्या वेळी यांचा मुक्काम मेनरोडवरती असतो. रस्त्यावरुन येणाऱ्या वाहन धारक व रस्त्यावरुन ये-जा करणारे नागरिक दिसले की हे अचानक हल्ला चढवितात. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. रात्री कळपाने फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले आहे.



काही पिसाट, रोगग्रस्त किळसवाणे कुत्रे दिवसभर भुंकत असतात व रात्री रडल्यासारखे भुंकतात त्यामुळे वाहनधारक, महिला, लहान मुलांना रस्त्याने जाताना देखील भीती वाटत आहे. अशी चर्चा नागरिकांच्या मध्ये होत आहे.
 मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून या गंभीर बाबीची दखल संबंधित प्रशासनान घेऊन या बेवारस मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या कडून होत आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆