======================================
======================================
सांगली : वार्ताहर दि. १५ सप्टेंबर २०२३
सांगली : मिरज तालुक्यातील अंकली फाटा येथे गुरुवारी रात्री सांगली ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी मिरजेकडून भरधाव वेगाने आलेल्या एका चार चाकी कारने नाकाबंदी करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला उडवले. त्यानंतर ती कार थेट रस्त्याकडेला असलेल्या एका वडापावच्या दुकानात घुसली. या अपघातात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
रामराव पाटील असे जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.
सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी अमावस्या असल्याने सांगली ग्रामीण पोलिसांनी अंकली फाटा येथे नाकाबंदी लावली होती. तेथे जखमी पाटील आणि त्यांचे सहकारी वाहनांची तपासणी करत होते. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिरजेकडून MH 42 BJ 4693 या नंबरची एक चार चाकी कार भरधाव वेगात आली. त्या कारला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र कारने पोलिसांना जोरदार धडक दिली. त्यानंतर ती एका वडापावच्या हॉटेलवर जाऊन आदळली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
कारचालक संतोष भीमराव मींद वय 35, रा. बिजेवाडी , इंदापूर , पुणे याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करीत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆