महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
=====================================
पलूस : वार्ताहर दि. 17 ऑक्टोबर 2023
पलूस तालुक्यातील दूधोंडी येथे दुधोंडी गणेशनगर रस्त्यावर असणाऱ्या कदम मळा येथील राजेंद्र मधुकर कदम वय 45 वर्षे यांचे विजे चा शॉक बसून दुर्दैवी निधन झाले. वीज वितरण कंपनीचे 11000 व्होल्टेज असणारी मेन लाईन चे विद्युत वाहिनी कदम यांच्या घरावरूनच गेली आहे. विजेच्या तारा वरती सुबाभूळ येत असल्याने ते सुबाभूळ तोडण्याकरिता घराच्या छतावर गेले होते. त्याची एक फांदी तुटली त्यानंतर अचानक अकरा हजार व्होल्टेजच्या प्रवाहा जात असणाऱ्या तारेला स्पर्श झाल्याने राजेंद्र मधुकर कदम यांना विजेचा शॉक बसला व त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना सकाळी साडेआठ वाजता घडली यानंतर शवविच्छेदन झाल्यावर दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्यावर दुधोंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी ,एक मुलगा, मुलगी ,भाऊ असा परिवार आहे राजेंद्र कदम हा दादा या नावाने ओळखला जात होता. तो पूर्ण वेळ शेती करत होता. अतिशय दिलदार मनाचा उमदा तरुण सर्वांच्या परिचयाचा होता. त्याचे वडील किर्लोस्कर कारखान्यातून सेवानिवृत्त झाले होते. मळ्यातच कदम वस्ती असल्याने घराशेजारीच मळा होता.
घरावरूनच 11 हजार वॉल्टची विद्युत वाहिनी गेल्याने त्यांच्या कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वीज वितरणच्या विभागाने ज्या ठिकाणी मोठा विद्युत प्रवाह घराजवळून जात आहे. तिथे काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही . जिथून विजेच्या तारा जात आहेत तिथे त्रासदायक ठरणारे वनस्पती त्याच्या फांद्या तोडण्याचे काम हे वीज वितरण चे असून , वेळीच ही कामे करत नसल्याने नागरिकांना हे काम करावे लागते आणि अशी जोखीम घेतल्याने असे दुःखद प्रसंग घडतात.
एका उमद्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याने उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी ,महिलांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता. ते दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते . नागरिकांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते .यावेळी कामगार नेते शिवाजी नाना मगर आणि मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर भैय्या जाधव व त्यांचे सहकारी तसेच कदम कुटुंबीयांचे नातेवाईक, मित्र परिवार, शेजारी ,तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी दूधोंडी येथे होणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆