yuva MAharashtra उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील कार्यालयावर मिरज येथून साबर हल्ला ; मुंबई सायबर क्राईम विभागाच्या पथकाने आरोपीला मिरज येथून घेतले ताब्यात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील कार्यालयावर मिरज येथून साबर हल्ला ; मुंबई सायबर क्राईम विभागाच्या पथकाने आरोपीला मिरज येथून घेतले ताब्यात



=====================================
=====================================

सांगली : वार्ताहर               दि. 6 ऑक्टोबर 2023 

सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील कार्यालयावर सांगली जिल्ह्यातील मिरज येथून सायबर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उजेडात आला. 
देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांचा बनावट मेल आयडी तयार करून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढणार्‍या संशयितास मिरजेतील नरवाड रस्त्यावरून मुंबई पोलिसांनी अटक केली. 
मोहम्मद इलियास याकूब मोमीन वय 33 वर्षे रा. अब्दुल कलाम कॉलनी, बोलवाड रस्ता, मिरज जि.सांगली असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

मुंबईतील सायबर क्राईम विभागाचे पथक काल गुरुवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सांगलीत दाखल झाले. पथकाने जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांची भेट घेऊन  घडलेल्या घटनेचा सविस्तर घटनाक्रम सांगितला. डॉ. बसवराज तेली यांनी तातडीने मिरज शहर पोलिसांना या पथकाला सहकार्य करण्याचे आदेश दिले. 
पथकाने मिरज पोलिसांच्या मदतीने मोमीनला बोलवाड रस्ता, मिरज येथून ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेऊन काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते.


फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांचा बनावट ई-मेल आयडी तयार करण्यात आला. या माध्यमातून संशयित मोमीनने विशेष कार्यकारी अधिकार्‍यांच्या नावाने सहा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे बनावट आदेश काढले. सायबर क्राईम विभागाने केलेल्या तपासात ही धक्कादायक बाब उजेडात आली.

मोमीन इलेक्ट्रॉनिक्स अभियंता आहे. त्याने आणखी काही अधिकार्‍यांच्या बदल्यांचे बनावट आदेश काढले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानेही या तपासात सहभाग घेतला आहे. पथकाने मोमीनच्या काही साथीदारांना रात्री उशिरा ताब्यात घेतले

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆