=====================================
=====================================
सोलापूर : सोलापूर जिल्हा कारागृहातील शिपायाने शनिवारी दि.९ डिसेंबर रोजी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्वत:जवळील बंदुकीतून कारागृहाच्या प्रवेशव्दारातच स्वतःवर तीन गोळ्या झाडल्या. विकास गंगाराम कोळपे (वय ३२, रा. जिल्हा कारागृह वसाहत, सोलापूर ) असे शिपायाचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सोलापूर येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलीस शिपायाने जीवन संपवण्याचा प्रयत्न कशामुळे केला? हे अद्याप समजू शकलेले नाही.
याबाबत अधिकची माहिती अशी की, विकास कोळपे हा पोलीस शिपाई नेहमीप्रमाणे कारागृहाच्या प्रवेशव्दारात गार्ड म्हणून कर्तव्य बजावत होता. सायंकाळी सहाच्या वाजण्याच्या सुमारास एसएलआर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज कारागृहात झाला. त्यांनतर कारागृहात एकच गोंधळ उडाला. तेथे कर्तव्यावर असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने तुरुंगाधिकारी प्रदिप बाबर यांनी रक्ताने माखलेल्या विकास यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले.
बंदुकीतील गोळ्या छातीला व बरगडीला घासून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान घटनेची महिती मिळताच, कारागृहाचे अधीक्षक हरीभाऊ मिंड आणि इतर अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. विकास हा मुळचा पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील रहिवाशी आहे. तो २०१३ मध्ये कोल्हापूर कारागृह, २०१६ मध्ये येरवडा कारागृह, त्यानंतर २०१७ मध्ये अहमदनगर व २०१९ मध्ये त्याने सांगली कारागृह येथे सेवा बजावली आहे. वर्ष २०२१ जुलै महिन्यात तो बदलीने सोलापूर जिल्हा कारागृह येथे सेवेत दाखल झाला. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्यास खासगी रुग्णालयात हलविल्याची माहिती अधिष्ठाता सुधीर देशमुख यांनी दिली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆