yuva MAharashtra भिलवडीत रेल्वे उड्डाणपूलाचे उद्घाटन

भिलवडीत रेल्वे उड्डाणपूलाचे उद्घाटन



=====================================
===================================== 

भिलवडी : वार्ताहर

भिलवडी (ता.१७) : भिलवडी स्टेशन ता.पलूस येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाचे उद्घाटन दि.१६ डिसेंबर रोजी करण्यात आले. तासगांव भिलवडी मार्गावरील भिलवडी ते नांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्रमांक ११७ येथील दोन मार्गिका उड्डाणपूल उभारले आहेत.
खासदार संजयकाका पाटील, माजी राज्यमंत्री आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नातून ९० कोटी रुपये खर्चातून याची उभारणी केली आहे. ५०० मीटर लांबीचा हा पूल आहे. येथे चितळे उद्योग समूह, एच.पी. गॅस प्लांट, पेट्रोलियम कंपनी असल्याने येथे प्रचंड अवजड वाहतूक आहे. रेल्वे आली की गेट बंद असायचे किंवा पेट्रोलची रेल्वे वॅगन आली की तब्बल तास दोन तास वाहतूक खोळंबली जात होती. त्याचा नाहक त्रास वाहनधारकांना होत होता. मात्र या उड्डाणपुलाने आता वाहतूक सुरळीत होणार असून त्याला गती मिळाली आहे.  भिलवडी स्टेशन रेल्वे ब्रीजचे उद्घाटन नागपूर येथून मंत्री महोदयांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी  उद्घाटन स्थळी परीसरातील व विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर यांच्या सह , रेल्वेचे अधिकारी, राजकीय नेते, वाहनधारक, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर प्रत्यक्ष वाहतुकीचा श्रीगणेशा झाला. 


राज्य मार्ग १५१ वरील टोप ते भिवघाट या मार्गावर हा पूल उभारला आहे. दरम्यान भिलवडी ते पाचवा मैल या दरम्यानच्या कामाकडे दुर्लक्ष झाले होते. भिलवडी, माळवाडी खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन आणि पुढे पाचवामैल या गावांसह परिसरातील गावातील लोकांना, वाहनधारकांना विशेषत: शालेय विद्यार्थी य‍ांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.  
अवजड वाहनांना मोठी कसरत करावी लागत होती.
खराब रस्त्यामुळे जनता त्रस्त होती. पुढे दर २० मिनिटांनी रेल्वेचे गेट पडायचे.
खड्डे आणि गेटमध्ये अडकुन पडण्याच्या त्रासातुन परिसरातील जनतेची विशेषतः वाहनधारकांची सुटका झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆