ऊस उत्पादकांच्या मागणिस्तव घेतला निर्णय : ऊसविकास योजना विस्तारणार
=====================================
कुंडल:वार्ताहर
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला यंदापासून गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्रति मेट्रिक टन अर्धा किलो साखर 15 रुपये दराने ऊस उत्पादकांना देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केली. हा निर्णय शेतकऱ्यांच्या मागणीनुसार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. कारखाण्याकडून यंदापासून 50 टक्के सवलतीच्या दरावर ऊस बियाणे पुरवठा ही करत आहे.
शरद लाड म्हणाले, हा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे आजवर 2 लाख 87 हजार 720 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे यातून 2 लाख 28 हजार 670 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. कारखाना स्थापनेपासून उच्चांकी गाळापाची परंपरा ही कारखान्याने जपली आहे.
कारखाना ऊस उत्पादकांना प्रति एकरी सभासद, बिगर सभासद असा भेदभाव न करता 50 ते 55 हजारांच्या ऊसविकास सुविधा पुरवते, यामुळे शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढ तर झाली आहेच शिवाय उत्पादन खर्च ही कमी झाला आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ठिबक सिंचन खालील क्षेत्रात वाढ करण्यासाठी नवनवीन योजना आणून ठिबककडे शेतकऱ्यांचा कल वाढवण्यात यश मिळवले आहे.
कारखान्याच्या उभारणी कालावधीत अनेक शेतकऱ्यांनी समभाग घेऊन सहकार्य केले पण जे सभासद होऊ शकले नाहीत परंतु कारखाना उभारणी पासून त्यांनी कारखान्याला ऊस गाळपासाठी पाठवून कारखान्याच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे त्या बांधिलकी पोटी आणि मी स्वतः गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जो दौरा केला त्यामध्ये अनेक ऊस पुरवठा करणाऱ्या पण सभासद नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या साखरेसाठीच्या मागण्या पाहून त्यांच्या मागणीचा आदर ठेवून आम्ही व्यवस्थापणाने हा साखर देण्याचा निर्णय घेतला आहे.
कारखाना क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या ध्येय धोरणाने आमदार अरुणअण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी अविरत कार्यरत असल्याने कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासास अल्पावधीत पात्र ठरला आहे. यामुळे राज्य व देश पातळीवरील अनेक पुरस्काराने सन्मानित ही केले आहे. त्यामुळे यंदापासून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊसाची नोंद कारखान्याकडे करावी आणि नोंदीतील जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे, संचालक ऍड सतीश चौगुले, सुभाष वडेर, जितेंद्र पाटील, सुकुमार पाटील, पी.एस.माळी, संग्राम जाधव, संजय पवार, अशोक विभूते, अनिल पवार, बाळकृष्ण दिवानजी, शीतल बिरनाळे, रामचंद्र देशमुख, जयप्रकाश साळुंखे, दिलीप थोरबोले यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆