yuva MAharashtra साने गुरुजींचे श्यामची आई पुस्तक म्हणजे संसाराचा अमृतकुंभ -- सुभाष कवडे

साने गुरुजींचे श्यामची आई पुस्तक म्हणजे संसाराचा अमृतकुंभ -- सुभाष कवडे


=====================================
=====================================

 भिलवडी : वार्ताहर          ११ फेब्रुवारी २०२४

साने गुरुजींचे श्यामची आई पुस्तक म्हणजे संसाराचा अमृतकुंभ आहे. युवकांचे चारित्र्य सुंदर करणारे हे पुस्तक प्रत्येक युवकाने वाचले पाहिजे घराला घरपण देऊन घरातील नातेसंबंध या पुस्तकामुळे दृढ होतात. माणसांची मने संवेदनशील बनवणारे हे पुस्तक अश्रूंचे मोल सांगते प्रेम ज्ञान आणि बळ ही त्रिसूत्री म्हणजे श्यामची आई हे पुस्तक होय असे उद्गार भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे यांनी काढले. ते सार्वजनिक वाचनालय भिलवडी (ता.पलूस) यांनी आयोजित केलेल्या सुवर्ण महोत्सवी वाचन कट्ट्यावर बोलत होते. साने गुरुजींच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी जयंती निमित्ताने श्यामची आई पुस्तकावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे अध्यक्ष स्थानी होते. यावेळी बोलताना श्री. टी. आर. कदम म्हणाले या पुस्तकावरील सिनेमाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले माणसांची मने स्वच्छ शुद्ध व सात्विक करण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे. रमेश चोपडे म्हणाले हे पुस्तक आईची माया दाखविते आई रागवते , मारते पण मुलांवर सुसंस्कार करते यातील हा शामचे पोहणे हा प्रसंग हेच दर्शवितो.
  संजय पाटील सर यांनी पुस्तकातील सुसंस्कार व मूल्ये यांचा परिचय करून दिला.
 हास्ययात्राकार शरद जाधव सर म्हणाले मी तीन वेळा या पुस्तकांचे वाचन केले मला प्रत्येक वेळी नवीन अर्थ व नवी मूल्ये सापडत गेली. युवकांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे राष्ट्रभक्ती , डोळस श्रद्धा यासाठी या पुस्तकाच्या वाचनाची गरज आहे.
   अध्यक्ष गिरीश चितळे म्हणाले हे पुस्तक सर्वांग सुंदर संस्कारक्षम आहे. शालेय विद्यार्थ्यांनी व पालकांनी पुस्तक जरूर वाचावे श्यामची आई पुस्तक म्हणजे सुंदर जीवनाचा परिपाठ आहे. 


या चर्चासत्रास पुरुषोत्तम जोशी , एके चौगुले , महावीर वठारे , प्रमोद कुलकर्णी यांच्या सह वाचनालयाचे सभासद , ग्रामस्थ , व सर्व सेवक उपस्थित होते.
 शेवटी खरा तो एकची धर्म ही सामुदायिक प्रार्थना झाली. ज.कृ. केळकर यांनी आभार मानले.

हेही पहा ----





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆