yuva MAharashtra मुलगा - मुलगी भेद नको... जन्माला येणाऱ्या मुलीचे स्वागत करूया ; दलित महासंघाच्या महिला सन्मान मेळाव्यात ठराव...

मुलगा - मुलगी भेद नको... जन्माला येणाऱ्या मुलीचे स्वागत करूया ; दलित महासंघाच्या महिला सन्मान मेळाव्यात ठराव...


=====================================
=====================================

भिलवडी - वार्ताहर दि. ५/२/२०२४
 
  "मुलगा - मुलगी असा भेद न करता, जन्माला येणाऱ्या  मुलीचे प्रत्येक कुटुंबामध्ये स्वागत केले पाहिजे" असा ठराव आज दलित महासंघाच्या व बहुजन समता पार्टीने आयोजित केलेल्या "महिला सन्मान मेळाव्या"मध्ये करण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दलित महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. पुष्पलता सकटे होत्या.
        दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी आयोजित भिलवडी -  माळवाडी (ता.पलूस) येथे दलित महासंघाचा महिला सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटक दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष मा. प्रकाश वायदंडे होते तर प्रमुख  मार्गदर्शक म्हणून दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे उपस्थित होते. 
       यावेळी बोलताना प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले की, "आज संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये स्त्रियांवर अमानुष  अत्याचार होत आहेत. मुलींना पळवून नेण्याचे आणि त्यांची विक्री करण्याची रॅकेट देशभर आणि जगभर काम करत आहे. अशा परिस्थितीतही  वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुली आपले कर्तुत्व दाखवत आहेत. परंतु, भारतामध्ये अलीकडच्या काळात रूढी, प्रथा - परंपराचे पुनर्वसन होऊ लागले असल्यामुळे महिलांच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन पुन्हा बदलू लागला आहे.  संविधानाने मुलगा मुलगी समान मानले आहे, तरी देखील कुटुंबामध्ये मुलाचा जेवढा सन्मान होतो तेवढा मुलीचा होत नाही. एवढेच नाही तर, जन्माला येणाऱ्या मुलीचे जीवन गर्भातच संपविले जाते.  हे सर्व थांबवले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक आईने, बहिणीने आणि स्त्रीने आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलीचे संरक्षण केले पाहिजे" असे आवाहन प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी केले.
           या मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना दलित महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे म्हणाल्या की, "स्त्रियांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले पाहिजे. अनेक क्षेत्रांमध्ये आपला स्वाभिमान जागविला पाहिजे. आपल्यावरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी स्वतःच पुढे आले पाहिजे". 


         या मेळाव्यामध्ये दलित महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस उत्तम आप्पा चांदणे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ, बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे, तसेच दिनकर वायदंडे सुरेश सकटे  यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार घनश्याम मोरे, पत्रकार अधिकराव लोखंडे, अनिल थोरात, दीपक कांबळे, म्हाकू मोरे, परवेज नायकवडी, ब्रह्मानंद वारे, दलित महासंघाचे पलूस तालुका अध्यक्ष नितीन मोरे उपस्थित होते. 
          वाळवा तालुका अध्यक्ष विजय दणाने यांनी प्रास्ताविक केले. दलित महासंघाच्या पलूस तालुका अध्यक्ष आशाताई मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले तर बाळासाहेब मोरे यांनी आभार मानले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆