yuva MAharashtra " थकवा " प्रमुख कारणे आणि प्राथमिक उपाय..

" थकवा " प्रमुख कारणे आणि प्राथमिक उपाय..


=====================================
=====================================



◼️थकवा

आज आपण पाहणार आहोत स्त्रियांना सतावणारा विषय म्हणजे थकवा. हल्ली प्रत्येकाच्या तोंडी सहज एक वाक्य येते,

'आज-काल फारच थकायला होत आहे.’

का बरे थकवा येत असावा?

या थकण्याने आपले बालपण हरवले, तरुणपण मरगळून गेले आणि म्हातारपण असह्य झाले. थकवा येण्याची कारणे काय?

का वाटत नाही उत्साह?

जाणून घेऊ यामागील कारणे आणि त्यावर उपचार करू.

◼️थकवा म्हणजे काय ?

एखाद्य विशिष्ट मांसपेशीची किंवा एकपेक्षा अनेक मांसपेशीची ताकद कमी होणे म्हणजे थकवा. काम करण्यास उत्साह न वाटणे, थोडय़ाशा परिश्रमानंतर दमून जाणे म्हणजे थकवा. हा थकवा शरीराचा असतो, तसाच मनाचाही असतो आणि म्हणून रडल्यानंतर थकल्यासारखे जाणवते. आपल्या बोलीभाषेत अनेक गोष्टी थकवा म्हणूनच आपण गृहीत धरतो. आळस आणि थकवा यात फरक आहे. आळसात आपली क्रियाशक्ती पुरेशी असते, तर थकण्यामध्ये शक्तिपात होतो आणि इच्छा असूनही पुरेशा प्रमाणात क्रिया करता येत नाहीत.

भारतात ३०-६० वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये या दुर्लक्षित थकव्याचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. अर्थात वयोपरत्वे शरीराची होणारी झीज आणि त्यामुळे जाणवणारा थोडा थकवा हा नैसर्गिक असतो.

प्रमुख कारणे आणि प्राथमिक उपाय

◼️झोपेच्या तक्रारी

विचित्र वेळी झोपणे, झोपेत खूप घोरणे, झोपताना जाणवणारा दम्याचा त्रास, सारखी स्वप्ने पडणे.. एक ना अनेक कारणांनी पुरेशी व शांत झोप होऊ शकत नाही. यामुळे मेंदूला व शरीराला पूर्ण विश्रांती मिळणे कठीण होते. दिवसभर मग थकवा जाणवतो.

शारीरिक व मानसिक तक्रारींवर योग्य औषधे तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी. आहार योग, ध्यान-धारणा, प्राणायाम शिकून घेऊन करावे.

झोपताना कोमट दुधात मध टाकून घ्यावे. दुधात ट्रीप्टोफन असते, यामुळे झोपेसाठी उपयोगी पडणारे सिरोटोनिन द्रव्य अधिक प्रमाणात तयार होते. मधातील कार्बोदके ही द्रव्ये मेंदूपर्यंत वेगाने पोहोचवतात.

खसखस व जायफळ घालून केलेली दुधाची खीर रात्री झोपताना घ्यावी.

झोपताना थोडे वाचन करावे शांत संगीताचा उपयोग करावा.

खोलीतील तापमान, दिव्यांचा प्रखर उजेड, आवाज या सर्वाची नोंद घ्यावी. अंधाराने मेलाटोनिन नावाचे द्रव्य मेंदूत तयार होते, ज्यामुळे नैसर्गिक झोप येण्यास मदत होतो.

भीतीदायक / संशयास्पद असे कार्यक्रम रात्री झोपेच्या वेळी बघू नयेत.

◼️रक्ताल्पता (अ‍ॅनिमिया)

लाल रक्तपेशी ऑक्सिजनचे वहन करीत असतात. लोह हा त्यांचा महत्त्वाचा घटक असतो. जेव्हा लोहाचे प्रमाण कमी होते, तेव्हा हा प्राणवायू पेशींपर्यंत कमी प्रमाणात पोहचतो. पेशींना पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने पेशींमधील थकवा आपणास जाणवू लागतो. चालून/जिना चढून धाप लागते. कामाची इच्छा होत नाही. सतत झोपावेसे वाटते. श्वास कष्टप्रद होतो.

लोहयुक्त आयुर्वेदिक औषधे तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी. लोहयुक्त औषधाने बरे न वाटल्यास पुढील तपासणी करणे गैरजेचे असते.

आहारात हिरव्या पालेभाज्या, खजूर, बीट, काळ्या मनुका, डाळी, फळे इत्यादीचे प्रमाण वाढवावे. लोहाच्या शोषणासाठी ‘क’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. त्यासाठी वरील पदार्थावर लिंबू पिळून घ्यावे. संत्री, मोसंबी, टोमॅटो, अननस इत्यादींचा आहारात समावेश करावा.

आवळ्याचा कोणताही पदार्थ रोज चालेल.


◼️रक्तातील साखर

शरीरातील न वापरता येणारी साखर शरीरात थकवा निर्माण करते. रक्तात कमी असलेली साखरेची पातळीही थकवा निर्माण करते. शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास पेशींना साखरेद्वारे उद्दीपन मिळणे हे दोन्ही प्रकारांत होऊ शकत नाही आणि थकवा जाणवतो.

मधुमेह असणाऱ्यांसाठी आहारात योग्य बदल करावेत. पुरेसा व्यायाम करावा.

साखरेची पातळी कमी होत असल्यास लगेचच फळांचा रस घ्यावा.

◼️थायरॉइड

शरीरातील इंधनातून किती- कशी- केव्हा आणि किती वेगाने ऊर्जानिर्मिती होईल हे थायरॉइड ग्रंथीद्वारे निर्माण होणारे स्रावांचे प्रमाण ठरवत असते. या ऊर्जेद्वारे शरीराची विविध कार्ये घडून येतात. या ग्रंथीचे कार्य जेव्हा काही कारणाने कमी होते, (हायपोथायरॉइडिझम) तेव्हा थकवा येतो. यासाठी रक्त तपासणी करून घेता येते. योग्य आयुर्वेदिक औषध व आहार योजन व्यायाम व सकारात्मक दृष्टिकोन असणे गैरजेचे असते. स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात.

◼️कॅफेन

चहा, कॉफी, कोकसदृश पेय घेतल्यावर कॅफेनचे दुष्परिणाम जाणवू लागतात. थोडय़ा प्रमाणात कॅफेन उत्तेजक असले तरी अतिरेकाने मात्र झोप न येणे, छातीत धडधडणे, अस्वस्थ होणे आणि मग थकल्यासारखे वाटणे ही लक्षणे निर्माण होतात. हे कारण अनेकदा थकण्याच्या संदर्भात दुर्लक्षित राहते.

हळूहळू करीत प्रमाण कमी करावे. एकदम बंद केल्यास इतर त्रास उद्भवतात.

◼️हृदयरोग

साफसफाई, खरेदी, जिने चढणे अशा लहानसहान गोष्टींनी दम लागतो. या क्रिया करताना हृदयावर रक्ताभिसरणाचा येणारा अधिकचा ताण सहन होत नाही. हाता-पायांपेक्षा महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा केला जातो. यामुळे थकवा जाणवतो. कामे पूर्ण करण्याच्या हट्टापायी स्त्रियांकडे दुर्लक्ष करतात आणि अंगावर काढतात.

संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ 
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

हेही पहा ----





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Tags