======================================
======================================
कुंडल : वार्ताहर दि. २९ फेब्रुवारी २०२४
पदं येतील, पदं जातील पण कार्यकर्ता हे एक असं पद आहे की याची उंची सर्वात जास्त आहे. कार्यकर्ता हा सर्वश्रेष्ठ असतो त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यभर कार्यकर्ताच रहावं.
असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गट नेते शरद लाड यांनी व्यक्त केले. ते कुंडल (ता. पलूस) येथे कार्यकर्ता शिबिरात बोलत होते.
शरद लाड म्हणाले, सध्याचे राजकारण नक्की कोणत्या दिशेला जात आहे हे सामन्यांच्याच काय तर नेत्यांच्या ही लक्षात येत नाही. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने अस्थिरतेच्या लाटेत वाहून जाण्यापेक्षा स्वतःला सावरलं आणि शांतपणे निर्णय घेतले तर एक नवीन दिशा सापडेल.
आपल्या राज्याला पुरोगामी संस्कृती आहे पण तरीही महाराष्ट्रात भाजपने मतदारांना वळवण्याची सर्व तंत्रे वापरली पण त्यांना यश मिळाले नाही त्यामुळे शेवटी पक्षच फोडायचे धोरण अवलंबले. यातून ते पक्ष फोडतील पण लोकांचे विचार फोडू शकणार नाहीत. लोकांच्यात राग आहे कारण, काहीतरी करण्यासाठी आपण ज्यांना सत्तेवर बसवले होते, त्यांना षडयंत्री राजकारणाने लोकनिर्णयाचा अवमान करून सत्ता काबीज केली हे लोकांच्या अद्याप पचनी पडले नाही आणि पडणार ही नाही. त्यामुळे आपण खासदार शरद पवार यांच्या विचारांची पताका घेऊन सामान्यांच्यात जाऊया लोक आपल्याला नक्की सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता प्रचारक असायला हवा यासाठी त्याला नेत्याची, पक्षाची ध्येय धोरणे माहिती असावीत यातून त्याने प्रयत्नात असावं आणि त्याच्या प्रयत्नांत सातत्य असावं कारण सगळ्या गोष्टींची एक वेळ निश्चित असते फक्त आपण सातत्य ठेवले पाहिजे.
संपूर्ण सांगली जिल्हा आमदार जयंत पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पलूस कडेगाव तालुक्याचे प्रश्न पोट तिडकीने ऐका ते आपापल्यापरीने सोडवूया, यासाठी गरज पडली तर निवासी कार्यकर्ता शिबिरे ही घेऊयात. आम्ही शरद आत्मनिर्भर योजनेतून सामान्यांच्या कामासाठी झटत आहोत. लोक आम्हाला कामं सांगतात आणि आम्ही ती करतो. लोकांना कामाचा माणूस हवाय, तो आपण होऊया.
मी ही एक कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली आणि आजही कार्यकर्ताच आहे. माझा कार्यकर्ता हा विचाराने सक्षम असला पाहिजे. तो कोणत्याही आमिषाला बळी पडता कामा नये यासाठी आपण युवकांची सक्षम पिढी घडवू असे आश्वासन त्यांनी पलूस- कडेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांना यावेळी दिले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆