======================================
======================================
कुंडल : वार्ताहर दि. 27 फेब्रुवारी 2024
षडयंत्री राजकारनाला बहुजनांनी बळी न पडता आपल्या विचारांवर ठाम रहा, आपले विचारच आपल्याला भविष्यात तारतील असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी व्यक्त केले.
ते कुंडल (ता.पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या स्मारकात आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर पोहोचत असलेल्या " राज्य रक्षण: युवा प्रशिक्षण" या शिबिरात पलूस-कडेगाव तालुक्याच्या कार्यकर्त्यांना संबोधताना बोलत होते. अध्यक्षस्थानी क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड हे होते.
विराज नाईक म्हणाले, देशातील लोकशाहीचा विसर पडू लागलाय त्यामुळे तिच्यावर आज आघात होतायत. हे आघात थोपवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा.
ईडीचा धाक दाखवुन सत्तेसाठी सर्व नियम धाब्यावर बसवून फक्त पक्षच नाही तर लोकांचा विश्वास मोडला जातोय. महाराष्ट्राची एक संस्कृती होती ती आता मोडीत निघाली आहे आणि आता गुंडांचे राज्य आले आहे, येथून सुसंस्कृतपणा लोप पावला आहे.
ज्या युवकांच्यावर देश अवलंबून असतो तोच युवक आज बेरोजगार आहे आणि नैराश्याने ही युवाशक्ती नशेच्या आहारी जात आहेत. यासाठी
आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून खासदार शरद पवार यांच्या कार्याचा विचार रुजवला तर येणारा काळ हा नक्की बदलेल.
यावेळी बी. के. नायकवडी म्हणाले,
भाजपा बहुजन समाजातील लोकांना नादाला लावून त्यांचा उपयोग करून राजकारणाची पोळी भाजून घेतायत. संविधानाचे सार्वभोमत्व संपुष्टात आणले जाते आहे यासाठी युवक जागृत झाला पाहिजे.
महाराष्ट्राचा चेहरा सहकारामुळे बदलला, त्यामुळे याच सहकारावर हे शासन घाले करत आहे. आपल्याकडे आमदार जयंत पाटील, आमदार अरुण लाड, आमदार मानसिंग नाईक ही वैचारिक अधिष्ठान असलेले नेते आहेत. त्यांच्या हाताला बळ देऊया आपण केलेल्या कामांना पुढे नेवुया. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या विचारांनी ही भूमी पवित्र आहे त्यांच्या त्यागाच्या या भूमीत पुन्हा स्फुल्लिंग पेटेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे स्वागत इंद्रजित पवार यांनी केले, प्रास्ताविक शिवराज शेळके यांनी केले. तर आभार विराज पवार यांनी मानले.
यावेळी बाळासाहेब पाटील, दिगंबर पाटील, सुरेश शिंगटे, जयदीप यादव, मोहन पाटील, प्रमोद मिठारी, ज्ञानेश पाटील, संतोष जाधव, यांचेसह पलूस - कडेगाव तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित होते.