yuva MAharashtra मंगळवेढ्याचे स्वामी समर्थ भगवान ; मंगळवेढ्यास गरज एका जांबुवंताची

मंगळवेढ्याचे स्वामी समर्थ भगवान ; मंगळवेढ्यास गरज एका जांबुवंताची



======================================
======================================



                            दि. २ मार्च २०२४
मंगळवेढा : श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप, ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते ‘चौथा अवतार’ मानले जातात.प्रकट स्थान जरी कर्दळीवनामध्ये वनात असले तरी स्वामी समर्थमहाराजांनी श्रीकाशीक्षेतत्रा पासून चीन, हिमालय, पुरी, बनारस, हरीद्वार, गिरनार, काठीवाड, कांचीपुरम, रामेश्वर ह्या ठिकाणांनाभेटी दिल्या, नंतर मंगळवेढ्याला प्रकट झाले.असे असले श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रत्यक्ष मानवरूपात दर्शन व लीला मंगळवेढा येथूनच साधारण १८३८ साला पासून मंगळवेढा येथे सुरु झाल्या.काही ग्रंथात मंगळवेढा हेच प्रकटस्थान म्हणून उल्लेख केल्याचे आढळते.येथे आरण्यात राहणाऱ्या स्वामीजींनी मंगळवेढेत अनेक लीला दाखविल्या त्यामध्ये बसाप्पा तेली यांची गरिबी नष्ट केली.त्याच्यासाठी सापांचे सोने केले. येथील बाबाजी भट नावाच्या ब्राह्मण गृहस्थाची कोरडी विहीर पाण्याने भरली होती. पंडित नावाच्या अंध ब्राह्मणाच्या डोळ्यात प्रकाश आणला यासारख्या अनेक लीला करून दाखविल्या व एक तप (बारा वर्ष )वास्तव्य केले.त्यानंतर पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर अशा गावी रहात रहात अक्कलकोट येथे २१ वर्षे त्यांनी वास्तव्य केले. अक्कलकोट येथील त्यांच्या वास्तव्यात त्यांच्या दिव्यत्वाची मोठ्या प्रमाणात प्रचिती आली. तेथे मोठा शिष्य परिवार जमा झाला. त्यांच्या साथीने दत्तसंप्रदाय बराच वाढविला.
             शिष्यवर्गाची संख्या सहज पंचविसाच्या घरात जाईल. यामध्ये श्रीबीडकर महाराज, श्रीशंकर महाराज आणि काळबोवा (पुणे), श्रीनृसिंह सरस्वती (आळंदी), श्रीसीताराम महाराज (मंगळवेढे), श्रीदेवमामलेदार (नाशिक), श्रीरांगोळी महाराज (मालवण), श्रीकृष्ण सरस्वती (कोल्हापूर), श्रीस्वामीसुत (मुंबई), श्रीबाळप्पा महाराज (अक्कलकोट), ब्रह्मनिष्ठ वामनबुवा (बडोदे), धोंडिबा पलुस्कर (पलुस) आणि श्रीगजानन महाराज (शेगांव), पिठले महाराज -मोरेदादा यांचे(दिंडोरी -त्रंबकेश्वर ) इत्यादी शंभरपेक्षा अधिक मठ स्वामीसेवेत कार्यरत आहेत.या मठांचा मोठ्या प्रमाणात प्रसार,प्रचार होऊन ती महत्वाची दत्तपीठ म्हणून उदयास आली आहेत.
              परंतु स्वामींचे प्रत्यक्ष प्रकट स्थान मानले गेलेल्या एक तप वास्तव्य करून अनेक लीला दाखविलेल्या पावन भूमी मंगळवेढ्यात त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.स्वामी चरित्रा मध्ये म्हटल्याप्रमाणे
'द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती । राहिले स्वामीराज यती। परी त्या स्थळीं प्रख्याती । विशेष त्यांची न जाहली।'  म्हणजे बारा वर्षे स्वामींनी मंगळवेढ्यात वास्तव्य करूनही त्यांचा विशेष प्रचार किंवा प्रख्याती झाली नाही ही खंत व्यक्त केली मला वाटते स्वामींच्या इच्छेनुसार अगोदर भक्तांच्या स्थानांचा उद्धार करून आपल्या मूळ प्रकटस्थानाचा उद्धार शेवटी करावा असे त्यांनी ठरविले असेल.त्यानुसार आत्ता मंगळवेढा्यातील आपल्या  महत्वाच्या म्हणजे सुरवातीच्या बारा वर्ष ज्या ठिकाणी वास्तव्य केलेल्या ठिकाणाचा उद्धार करण्यास सुरवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून स्वामीकृपेच्या अनुभूतीचा प्रसार व प्रचार होण्यास वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात सुरवात झाली आहे. अनेक सेवेकऱ्यांना याची प्रचिती व अनुभव येऊ लागल्याने समर्थ मंदिरात मोठ्या प्रमाणात दोन्ही वेळच्या नित्यआरतीस व पौर्णिमेच्या महाआरतीस भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. भविष्यात गाणगापूर, अक्कलकोट प्रमाणे भक्तांचा ओघ वाढून एक मोठे दत्तपीठ म्हणून नावारूपास येईल.
           प्रत्यक्ष स्वामींच्या निवासाने प्रदीर्घ सहवासाने पावन झालेल्या स्वामी मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सेवेकर्‍यांनी  हाती घेतले असून यामध्ये स्वामींचे निवासस्थान, बाबाजी भटांची विहीर,स्वामीच्या सहवासाचा वटवृक्ष यांच्या पवित्र दर्शनाचा लाभ भक्तांना घेण्यात येणार आहे.यासाठी आत्ता सुरु असणाऱ्या मूळगाभाऱ्याच्या नूतनीकरणाच्या कार्यास सर्वांनी आपल्या सदिच्छेनुसार,यथाशक्ती सहकार्य करून स्वामींसेवेबरोबर स्वामींकृपा प्राप्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
              मंगळवेढ्याचा इतिहास पाहिला तर हजार वर्षांपूर्वी कल्याणीच्या चालुक्य घराण्यातील सम्राटाच्या राजधानीचे ठिकाण असल्यामुळे असणारे वैभव,मानवतावादाचे कालजयी प्रेरक मार्गदर्शक म्हणजे  महात्मा बसवेश्वर यांची कर्मभूमी,जवळजवळ पंधरा पेक्षा जास्त महान संतामध्ये काहींची जन्मभूमी, कर्मभूमीच्या माध्यमातून लाभलेला त्यांचा सहवास,छत्रपतींच्या इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी चे साक्षीदार,साधारण सहा वर्षे औरंगजेबच्या माध्यमातून अर्ध्या हिंदुस्थाच्या राजधानीचे ठिकाण होते.त्याबरोबर असं म्हणतात माणूस पेरला तरी चौथ्या दिवशी उगवेल, अशी ही मंगळवेढ्याची सुपीक भूमी! या भूमीत जसा सोन्यासारखा पिकतो जोंधळा ; तसाच इथे फुलतो भक्तीचा मळा.धान्याचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या मंगळवेढ्यात दुष्काळात दामाजीपंतांनी धन्यांची कोठारे खुली करून दातृत्वाचे दर्शन झाले.असा हा  उज्वल कर्तृत्व,दातृत्व व नेतृत्व यांचा संगम असणारा भव्य इतिहास असणारे मंगळवेढा यासारखे शहर देशात नव्हे जागात दुसरे शोधूनही सापडणार नाही पण या ऐतिहासिक संपन्नतेचा प्रसार व प्रचार करण्यास कुठेतरी कमतरता जाणवत आहे प्रत्येक विषयावरती योग्य काम झाल्यास  मंगळवेढा ऐतिहासिक,अध्यात्मिक,  सांस्कृतिक,सामाजिक दृष्ट्या  जागतिक कीर्तीचे शहर बनेल यासाठी ज्याप्रमाणे वाल्मीकी रामायणाच्या युद्धकांडामध्ये हनुमंतास आपल्या हरवलेल्या शक्तीची जम्बुवन्ताने आठवण करून  दिली,त्याप्रमाणेच मंगळवेढ्याला एका जांबुवंताची गरज आहे.



लेखक --
दिगंबर साळुंखे
अध्यक्ष समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था
मो -9049106853
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Youtube Link
👇

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆